चार टँकरने भागतेय नागरिकांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:52 AM2019-04-29T00:52:19+5:302019-04-29T00:53:21+5:30

जलसाठे आटत आहेत़ भूगर्भातील पाणीपातळी खोलवर जात आहे़ पाणीस्त्रोत गायब होत असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस वाढणार असेच एकंदरीत चित्र आहे.

Four tankar supply water to thirsty people | चार टँकरने भागतेय नागरिकांची तहान

चार टँकरने भागतेय नागरिकांची तहान

googlenewsNext
ठळक मुद्देकंधार तालुका : तांड्यावर पाण्यासाठी कसरत

कंधार : जलसाठे आटत आहेत़ भूगर्भातील पाणीपातळी खोलवर जात आहे़ पाणीस्त्रोत गायब होत असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस वाढणार असेच एकंदरीत चित्र आहे. तालुक्यात चार टँकरचा शिरकाव झाला आहे. कुरूळा, रेखातांडा, पोमातांडा, नरपटवाडी, जिवलातांडा येथील नागरिकांची तहान टँकरवर भागत असून पाण्यासाठी झुंबड उडत आहे. हरीलालतांडा, बदुतांडा, शिराढोणतांडा येथे पाणीटंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत असल्याचे चित्र असून टँकरच्या प्रतीक्षेत गावे आहेत.
मागील वर्षी सरासरी पर्जन्यमान झाले नसल्याने नदी- नाले, तलाव, प्रकल्पात जलसाठे वाढले नाहीत. गत काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने पाणीसमस्या वाढत आहे. पाणीटंचाई प्रश्रावर उपाययोजना करण्यासाठी तालुकास्तरावर प्रयत्न केले गेले. दोन टप्प्याचा कृती आराखडा प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला. तो उशिरा पाठविला अन् उशिरा मंजुरी मिळाली. त्यामुळे अंमलबजावणी उशीरच होईल, हे अपेक्षित होते.
जानेवारी ते मार्च या कालावधीचा ५ कोटी १ लाख ३४ हजारांच्या खर्चास आणि ३९४ उपाययोजना करण्यास मंजुरी मिळाली. परंतु, अंमलबजावणी करण्यास मुहूर्त लांबत गेला. नवीन विंधन विहिरी, नळयोजना विशेष दुरूस्ती, पूरक नळयोजना, विंधन विहीर विशेष दुरूस्ती, विहीर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा, विहिरी खोल करणे/गाळ काढणे या उपाययोजना नावालाच राहिल्या. त्यासाठीचे प्रस्ताव, अंदाजपत्रक यातच वेळ गेला.
एप्रिल ते जून या कालावधीसाठी दोन प्रकारच्या उपाययोजना व २३६ संख्यांना मंजुरी आहे. विहिरी अधिग्रहण, ६० टँकरने ५१ गावे, वाडी-तांड्यावर पाणीपुरवठा करणे मोठे आव्हान आहे. हळूहळू पाणीटंचाईची गावे,वाडी,तांडे संख्या वाढण्याचे एकंदरीत चित्र आहे.
दुसऱ्या टप्प्यात उस्माननगर, आलेगाव, हाळदा, हणमंतवाडी, शेकापूर, तेलूर, कागणेवाडी, टोकवाडी, बोरी खु., चौकीतांडा, दैठणा, देवईचीवाडी, मजरे धर्मापुरी, धर्मापुरीतांडा, गुलाबवाडी, गुलाबवाडीतांडा, बिंडा, दिंडा, गुंडा, गुंटूर, गुंटूरतांडा, कळकावाडी, कल्हाळी, लालवाडी तांडा, लिंबा तांडा, राठोडनगर, मसलगा पु., नंदनवन , सोमसवाडी, महादेवमाळ तांडा, सावरगाव नि., शिराढोण, हिरामण तांडा, ढाकुनाईक तांडा, तेलंगवाडी, सोनमाळ तांडा, कौठा पु. आदी गावे, वाडी, तांडे पाणीटंचाईचा प्रखर सामना करीत आहेत. यावेळी उपाययोजना करताना प्रशासनाला प्राधान्याने कामे करावी लागणार आहेत.
२६ एप्रिलपर्यंत ५६ पैकी ४० विंधन विहीर, विहीर अधिग्रहण प्रस्ताव मंजूर झाले. उर्वरित प्रस्तावात १ रद्द, काही तपासणीस्तरावर असल्याचे समजते. तात्पुरती पुरक नळयोजना व नळयोजना विशेष दुरूस्तीचे ३२ प्रस्ताव जिल्हास्तरावर मंजुरीसाठी प्रस्तावित असल्याचे समजते. मे महिन्यात पाणीटंचाईचा प्रश्न उग्र रूप धारण करेल. अशावेळी उपाययोजना करून नागरिकांची तहान भागविण्यासाठी कशी अंमलबजावणी होणार आहे. हा उत्सुकतेचा विषय असला तरी तांड्यावरील नागरिकांना मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़
एप्रिल ते जून कालावधीत उपाययोजना मंजूर
कंधार तालुक्यातील पाणीटंचाईचे संकट सोडविण्यासाठी तहसीलदार सखाराम मांडवगडे, गटविकास अधिकारी कैलास बळवंत, उपमुख्य कार्यकारी अभियंता कारलेकर, अव्वल कारकून बळवंत वरपडे, पं.स.विस्तार अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करत आहेत़ एप्रिल ते जून या कालावधीसाठी दोन प्रकारच्या उपाययोजना व २३६ संख्यांना मंजुरी आहे. विहिरी अधिग्रहण, ६० टँकरने ५१ गावे, वाडी-तांडयावर पाणी पुरवठा करणे मोठे आव्हान आहे. हळूहळू पाणी टंचाईची गावे,वाडी,तांडे संख्या वाढण्याचे एकंदरीत चित्र आहे.

Web Title: Four tankar supply water to thirsty people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.