वाळूच्या धक्क्यांचा लिलाव न झाल्याने दरात चार पटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 07:35 PM2020-01-20T19:35:29+5:302020-01-20T19:37:37+5:30

जिल्ह्यात साधारणता मार्च ते एप्रिल या महिन्यात वाळू धक्क्यांचे लिलाव करण्यात येतात़

Fourfold increase in the rate at which sand shocks are not auctioned | वाळूच्या धक्क्यांचा लिलाव न झाल्याने दरात चार पटीने वाढ

वाळूच्या धक्क्यांचा लिलाव न झाल्याने दरात चार पटीने वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देरात्री आठ वाजता सुरु होते वाहतूक हायवा ४० हजार तर टेम्पो ५ हजार रुपयांना 

नांदेड :वाळू धक्क्यांचा अद्याप लिलावच न झाल्यामुळे वाळूच्या दरात चार पटीने वाढ झाली आहे़ छुप्प्या मार्गाने वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात येत असून गोदापात्राच्या शेजारील शेतांमध्ये त्याचा साठा करण्यात येत आहे़ नांदेड शहरात गोदावरी, आसना, कौठा परिसर, पश्चिम वळण रस्ता या ठिकाणाहून दररोज हजारो ब्रास वाळूचा उपसा करण्यात येत आहे़ रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंत छोट्या वाहनाद्वारे या वाळूची वाहतुक करण्यात येते़ प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा सर्व प्रकार सुरु आहे़ परंतु अद्यापही त्यांच्यावर ठोस कारवाई करण्यात आली नाही़

जिल्ह्यात साधारणता मार्च ते एप्रिल या महिन्यात वाळू धक्क्यांचे लिलाव करण्यात येतात़ त्यातून प्रशासनाला मोठा महसूलही मिळतो़ परंतु अद्याप लिलाव झाले नसल्यामुळे वाळूची टंचाई भासत आहे़ त्यामुळे अनेक बांधकामे रखडली आहेत़ त्यामुळे बांधकाम व्यावसायिक  किंवा स्वत: बांधकाम करणारे मिळेल त्या भावाने वाळू खरेदी करीत आहेत़ आजघडीला ४०७ हा वाळूचा टेम्पो जवळपास पाच हजार रुपयांना मिळत आहे़ तर हायवा ४० ते ५० हजारांच्या घरात गेला आहे़ शहरातील कौठा, पश्चिम वळण रस्ता, गोवर्धन घाट या भागात वाळू उपसा करण्याची परवानगी नाही़ 

परंतु या ठिकाणी रात्रभर वाळू उपसा करण्यात येतो़ वजिराबाद ते गोवर्धन घाट रस्त्याच्या कडेलाच वाळू उपसा करणारी ही वाहने दिवसभर उभी असतात़ रात्री आठ वाजेनंतर वाळू वाहतुकीला जोर चढतो़ रात्रभर हा बिनबोभाटपणे हा वाळू उपसा सुरु आहे़ असे असताना तलाठी, तहसिलदार, पोलिस प्रशासन यांच्याकडून या वाळू माफीयांवर कुठलीही कारवाई केली जात नाही़ कौठा भागातून रात्रभर जवळपास तीनशेहून अधिक टेम्पोच्या फेऱ्या मारण्यात येतात़ त्यामुळे रस्त्यांचीही वाट लागली आहे़ 
शाळा व्यवस्थापन, ग्रामस्थांनी केली होती तक्रार

कौठा भागात जिल्हा परिषदेची शाळा आहे़ या शाळेच्या समोरुनच वाहनाद्वारे वाळू आणली होती़ त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा मोठा त्रास होतो़ याबाबत ग्रामस्थ व शालेय शिक्षण समितीने शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते़ परंतु गेल्या दोन वर्षापासून शाळेच्या या निवेदनाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे़ त्यामध्ये विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होत आहे़ आसना व इतर ठिकाणच्या वाळूमध्ये मातीचे मिश्रण असते़ त्यामुळे उपसा केल्यानंतर शेजारील शेतात वाळू धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ या ठिकाणी टेम्पोत पाण्याचा पाईप सोडून ती वाळू धुऊन घेण्यात येते़ गोदावरी काठावरील अनेक शेतात मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे करण्यात आले आहेत़

याबाबत कौठा भागातील तलाठी मनोजराव देवणे यांच्याशी संपर्क साधला असता, वाळू उपसा पुन्हा सुरु असल्याबाबत ते अनभिज्ञ होते़ काही दिवसापूर्वीच वाळू माफीयावर कारवाई केली होती़ त्यांना दंडही लावला होता़ पुन्हा एकदा कारवाई करण्यात येईल असे स्पष्टीकरण त्यांनी दिले़ तसेच या भागात वाळू उपसा सुरु नसल्याचेही ठामपणे त्यांनी सांगितले़ 

Web Title: Fourfold increase in the rate at which sand shocks are not auctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.