नांदेड मनपाच्या पावती पुस्तक घोटाळ्यात चौथी विकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 07:31 PM2019-11-18T19:31:42+5:302019-11-18T19:35:35+5:30
स्वच्छता निरीक्षक तडवी अपहारप्रकरणी निलंबित, गुन्हाही दाखल
नांदेड : व्यवसाय परवाना नूतनीकरणातील अपहार प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे दिसून येते. काही जणांकडून पैसे वसूल करुनही पावत्या दिल्या नसल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात आता स्वच्छता निरीक्षक तडवी यांना निलंबित करण्यात आले असून सहायक आयुक्त प्रकाश गच्चे यांच्या फिर्यादीवरुन त्यांच्याविरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
मनपातील व्यवसाय परवाना नूतनीकरणच्या (युजर चार्जेस) पावती पुस्तकातील घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. स्वच्छता निरीक्षक तडवी यांना निलंबित करण्यापूर्वी याच प्रकरणात स्वच्छता निरीक्षक संजय जगतकर, बालाजी देसाई आणि बिल कलेक्टर अकबर खान यांनाही निलंबित करण्यात आलेले असून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंदही झाली आहे.
स्वच्छता निरीक्षक वसीम हुसेन तडवी यांच्यावर एक लाख ४६ हजार ८२० रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तडवी हे वजिराबाद क्षेत्रीय कार्यालय क्र. ४ मधील स्वच्छता निरीक्षक आहेत. सन २०१८-१९ या दरम्यान वापरलेली पावती-पुस्तके क्र. ९६७० व ७९ मधील ५१ पावत्यांत अनियमितता आढळून आल्यानंतर मनपाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. तडवी यांनी वापरलेल्या पावती पुस्तकास काही पावत्या कोऱ्या असल्याचे आढळून आले आहे तर संचयिकेत संबंधित पार्टीकडून मात्र रक्कम वसूल केलेली पावती आढळल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. प्रकरणाची व्याप्ती लक्षात येताच उपायुक्तांच्या आदेशानंतर सहायक आयुक्त प्रकाश गच्चे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन स्वच्छता निरीक्षक वसिम तडवी यांच्या विरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत महानगरपालिकेचे आयुक्त लहुराज माळी यांच्याशी संपर्क साधला असता युजर चार्जेस पावती पुस्तक वसुलीचे आॅडिट सुरू करण्यात आले असल्याचे सांगत नागरिकांनी कोणत्याही वसुलीचे पैसे महानगरपालिकेकडे आॅनलाईन पद्धतीने भरावेत, असे आवाहन त्यांनी केले.