मद्यपींना रान मोकळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:18 AM2021-04-01T04:18:51+5:302021-04-01T04:18:51+5:30
पथदिवे दुरुस्तीकडे दुर्लक्ष नांदेड, शहरातील मुख्य रस्ता असलेल्या कॅनॉल रस्त्यावरील पथदिवे मागील अनेक महिन्यांपासून बंदावस्थेत असून, ते दुरुस्त करण्यात ...
पथदिवे दुरुस्तीकडे दुर्लक्ष
नांदेड, शहरातील मुख्य रस्ता असलेल्या कॅनॉल रस्त्यावरील पथदिवे मागील अनेक महिन्यांपासून बंदावस्थेत असून, ते दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येते. परंतु, पथदिवे दुरुस्तीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केलेले दिसत आहे. या रस्त्यावर रात्रीला घडणाऱ्या अनुचित प्रकारास संबंधित विभागास जबाबदार धरावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
अंतर्गत रस्ते नादुरुस्त
नांदेड, वाडी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या लोकमित्रनगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांकडून नियमितपणे पाणीपट्टी, घरपट्टी व इतर कर ग्रामपंचायतीकडे भरले जातात. परंतु, नागरी सुविधा देण्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने कर भरावा की नाही, असा प्रश्न या भागातील रहिवाशी उपस्थित करत आहेत.
नियमावलीस केराची टोपली
नांदेड, शहरातील पिरबुऱ्हाणनगरमध्ये सायंकाळच्यावेळी बहुतांश दुकाने उघडली जात आहे. ज्या दुकानांना सायंकाळी उघडण्याची परवानगी नाही ती दुकाने उघडून सेवा दिली जात आहे. त्यात काही हॉटेल्सचाही समावेश आहे. या भागात कोरोना नाही का, असा सवाल इतर भागातील रहिवाशी करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी गस्त घालण्याची गरज आहे.
टरबुजाची मागणी घटली
नांदेड, मार्च महिन्यात टरबुजाची आवक वाढते त्याचप्रमाणे मागणीदेखील वाढते. परंतु, यंदाच्या हंगामात टरबुजाची मागणी घटली आहे. कोरोनामुळे बहुतांश नागरिकांनी टरबूज खाण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. त्यापेक्षा पपई, खरबूज, मोसंबीची मागणी वाढली आहे. टरबूज खाल्ल्याने खोकला वाढत असल्याच्या भीतीने नागरिक टरबूज खरेदी करत नसल्याचे बोलले जात आहे.
मशागतीच्या कामांना प्रारंभ
नांदेड, लॉकडाऊनमुळे लग्नसमारंभ तसेच इतर कार्यक्रम बंद असल्याने एप्रिलमध्ये सुरू होणारी मशागतीची कामे मार्च महिन्यातच आटोपल्यात जमा आहेत. ग्रामीण भागात सध्या गावात कमी आणि शेतात अधिक नागरिक दिसून येत आहेत. हळद, गहू, ज्वारी, हरभरा आदीची रानं मोकळी झाल्याने त्याची मशागत करून घेतली जात आहे.