नांदेड जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना डॉक्टरांतर्फे मोफत सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 08:28 PM2018-04-12T20:28:28+5:302018-04-12T20:28:28+5:30
जिल्ह्यातील सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीला नाम ही संघटना धावून आली असून आता या सामाजिक उपक्रमात योगदान देण्यासाठी नांदेडचे नामवंत डॉक्टर्सही पुढे आले आहेत़ नामच्या वतीने हे डॉक्टर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना नि:शुल्क आरोग्य सेवा देणार आहेत़
नांदेड : जिल्ह्यातील सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीला नाम ही संघटना धावून आली असून आता या सामाजिक उपक्रमात योगदान देण्यासाठी नांदेडचे नामवंत डॉक्टर्सही पुढे आले आहेत़ नामच्या वतीने हे डॉक्टर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना नि:शुल्क आरोग्य सेवा देणार आहेत़ त्यासाठी नामच्या पदाधिकाऱ्यांसोबत डॉक्टरांची बैठकही घेण्यात आली आहे़
नाम फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यात अनेक कामे सुरु आहेत़ त्यासाठी स्वयंसेवी संघटनांकडून भरभरुन मदत करण्यात येत आहे़ त्यात आता नांदेडातील नामवंत डॉक्टरांनीही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या सुदृढ आरोग्यासाठी निर्धार केला आहे़ यासंदर्भात इमा भवन येथे बैठक घेण्यात आली़ या बैठकीत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शहरातील नामवंत डॉक्टर्स, रुग्णालये नि:शुल्क सेवा पुरविणाऱ आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने तालुकानिहाय दुर्गम व अतिगरजेच्या ठिकाणी रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे़ रुग्णांची रक्त तपासणी, दंत तपासणी, समुपदेशन व जनजागरण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत़ डॉ़ आश्विन लव्हेकर यांच्या पुढाकाराने टेलीमेडीसीनद्वारे बहिरेपणा तपासणी व निदान करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे़
सर्वसामान्य रुग्णांसाठी जेनेरिक औषधींची उपलब्धता करुन देण्याची जबाबदारी डॉ़ हंसराज वैद्य व डॉ़आश्विन तळणीकर यांनी घेतली आहे़ तर डॉ़ येळीकर यांच्या रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे़ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची आरोग्यविषयक जबाबदारी आधारचे डॉ़ प्रदीप जाधव, डॉ़सुरेश कदम, डॉ़ संजय कदम यांनी घेण्याचे मान्य केले आहे़ तर डॉ़दत्ता मोरे हे दंत चिकित्सा व निदान करणार आहेत़ अशाप्रकारे शहरातील नामवंत डॉक्टरांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे केला आहे़
यावेळी झालेल्या बैठकीला नामचे जिल्हा समन्वयक डॉ़ अशोक बेलखोडे, प्रा़ डॉ़ बालाजी कोम्पलवार, आयएमचे अध्यक्ष डॉ़सुरेश कदम, नामचे सल्लागार दीपनाथ पत्की, डॉ़ बी़ जी़ मोरे, राठोड, पांडुरंग कंधारे, प्रा़ उमेद महाजन, गायकवाड, राजकुमार जाधव यांची उपस्थिती होती़
दरम्यान, नामच्या वतीने जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांवर स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने शिबिरे चालविण्यात येतात़ त्याला आता तज्ज्ञ डॉक्टरांची जोड मिळणार आहे. नामच्या पदाधिकाऱ्यांसोबत इमाची बैठक घेण्यात आली आहे़ या बैठकीत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आरोग्य सेवा देण्यासाठी अनेक नामवंत डॉक्टर पुढे आले आहेत़ याबाबत आणखी एक बैठक होणार असून कार्यक्रमाची रुपरेषा ठरविणार असल्याची माहिती इमाचे अध्यक्ष डॉ़ सुरेश कदम यांनी दिली़