ऋण फेडण्यासाठी आठ वर्षांपासून मोफत वासंतिक वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 12:29 AM2019-05-05T00:29:43+5:302019-05-05T00:30:01+5:30
उन्हाळी सुट्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गोडी कायम रहावी. त्याचवेळी आपण गावचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने गावकऱ्यांच्याच मदतीने कृष्णूर येथे गेल्या आठ वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ४० दिवसांचा मोफत वासंतिक वर्ग चालविण्यात येत असून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे.
अनुराग पोवळे ।
नांदेड : उन्हाळी सुट्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गोडी कायम रहावी. त्याचवेळी आपण गावचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने गावकऱ्यांच्याच मदतीने कृष्णूर येथे गेल्या आठ वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ४० दिवसांचा मोफत वासंतिक वर्ग चालविण्यात येत असून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे.
नायगाव तालुक्यात कृष्णूर येथील जि.प. शिक्षक वैजनाथ हंगरगे यांनी २००१ मध्ये नोकरी निमित्ताने गाव सोडले. त्यानंतर गावात ते कधी-मधी येत होते. कृष्णूर हे तसे खेडेच. शैक्षणिक वातावरणाची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण दहावी-बारावीपर्यंतच. त्यात मुलींचे तर दहावीच्या पुढे क्वचितच शिक्षण व्हायचे.
किशोरवयीन विद्यार्थी हे शालेय जीवनात मिळणा-या कौतुकाच्या थापेने प्रोत्साहित होतात. हेच प्रोत्साहन विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी हंगरगे यांनी पुढाकार घेताना लहान-मोठ्या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना गावामध्ये सर्वांसमक्ष बक्षीस वितरण केले जाते. यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत गेले. शैक्षणिक वातावरण हळूहळू तयार होवू लागले. यातूनच २०१२ मध्ये कृष्णूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये ४० दिवसांचा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वासंतिक वर्ग सुरू केला. पहिल्या वर्षी हंगरगे यांनी स्वत: इतर दोन शिक्षकांना मानधन दिले. त्यानंतर मात्र गावकरी या उपक्रमात सहभागी झाले. गावकºयांनीही वासंतिक वर्गात शिकवणाºया शिक्षकांना मानधन देण्यासाठी लोकवर्गणी गोळा केली. याच वर्गणीतून हा उपक्रम आठ वर्षांपासून सुरू आहे. यंदा २ मे रोजी हा उपक्रम सुरू झाला असून ६५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. वैजनाथ हंगरगे यांच्यासह जावेद शेख, दत्ता सूर्यवंशी, साधना कदम, सुधाकर ढगे हे शिक्षक दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान, मराठी व स्पर्धा परीक्षा तोंडओळख हे विषय शिकवत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे व त्यांच्यातील न्यूनगंड दूर व्हावा, हा या उपक्रमामागचा एकमेव हेतू असल्याचे हंगरगे यांनी सांगितले.
कृष्णूर येथे सुरू असलेल्या मोफत वासंतिक वर्गात कृष्णूर येथे ज्या विद्यार्थ्यांचे नातेवाईक आहेत अशा दहा ते बारा गावचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. खाजगी शिकवणी परवडत नाही असे विद्यार्थी आपल्या नातेवाईकाकडे राहून ते वासंतिक वर्गाचा लाभ घेतात.