नांदेडसह चार रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना मोफत वायफाय सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:31 AM2018-04-15T00:31:34+5:302018-04-15T00:31:34+5:30
रेल्वे प्रबंधक मंडळाच्या वतीने या वर्षी नांदेड, नरसापूर, जालना व परभणी रेल्वे स्थानकांवर नि:शुल्क वायफाय सेवा सुरू करण्यात आली असून या सेवेचा फायदा आता प्रत्यक्षात प्रवाशांना घेता येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : रेल्वे प्रबंधक मंडळाच्या वतीने या वर्षी नांदेड, नरसापूर, जालना व परभणी रेल्वे स्थानकांवर नि:शुल्क वायफाय सेवा सुरू करण्यात आली असून या सेवेचा फायदा आता प्रत्यक्षात प्रवाशांना घेता येणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासनाने वर्ष २०१७ मध्ये नांदेड रेल्वे प्रबंधक मंडळातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना वायफायची सुविधा देणार असल्याचे सांगितले होते. त्या अनुषंगाने औरंगाबाद रेल्वे स्थानकावर वर्ष २०१७ मध्ये नि:शुल्क वायफाय सुविधेला सुरूवात करण्यात आली. परंतु, नांदेड, नरसापूर, जालना व परभणी रेल्वे स्थानकांवर काही तांत्रिक अडचणींमुळे ही सुविधा सुरू होऊ शकली नाही.
दरम्यान, नांदेड रेल्वे प्रबंधक मंडळाच्या तांत्रिक विभागाने सर्व अडचणी दूर करून नांदेड, नरसापूर, जालना व परभणी रेल्वे स्थानकांवर या वर्षीपासून वायफायची सुविधा सुरू केली आहे. परंतु, सद्यस्थितीत रेल्वे प्रशासनाच्या वतीने अधिकृतरीत्या वायफाय सेवेचे उद्घाटन केलेले नाही. मात्र येत्या काही दिवसांत रेल्वे बोर्डाकडून परवानगी मिळाल्यानंतर अधिकृतरीत्या या सेवेचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातील सूत्रांच्या वतीने सांगण्यात आले.
३० मिनिटे घेता येईल सुविधेचा लाभ
प्रवासी ३० मिनिटांपर्यंत या सेवेचा मोफत लाभ घेऊ शकतात. त्यानंतर सदर सुविधा बंद होईल. जर एखाद्या प्रवाशाला यापेक्षा जास्त वेळ सुविधेचा लाभ घ्यावयाचा असल्यास संबंधित प्रवाशाला दुसरा मोबाईल क्रमांक देऊन सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
अखंडित वायफाय सेवेसाठी ३१ मोडेमची व्यवस्था
नांदेड येथील श्री हुजूर साहिब रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना नि:शुल्क व अखंडित वायफाय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ३१ मोडेम बसविण्यात आले असून या मोडेमची रेंज ही ५० मीटरपर्यंत राहणार आहे. विशेष म्हणजे वायफायची स्पीड ही ‘एक जीबी’ राहिल्यामुळे प्रवासी अर्धा तास या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
प्रवाशांनी अशी घ्यावी वायफायची सुविधा
रेल्वे स्थानकावर प्रवासी आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मोबाईलचे वायफाय सुरू केल्यानंतर वायफाय कनेक्ट होईल. त्यानंतर संबंधित मोबाईलधारक प्रवाशांना सर्वप्रथम त्यांचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर मोबाईलवर ओटीपी क्रमांक प्राप्त होईल. आणि तो क्रमांक टाकताच प्रवाशांना ३० मिनिटापर्यंत नि:शुल्क वायफाय सेवेचा लाभ मिळणार आहे.