अभिनय माझ्यासाठी आनंदसोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:20 AM2018-03-20T00:20:14+5:302018-03-20T00:20:14+5:30
१९९२ मध्ये ‘गेला माधव कुणीकडे?’ या नाटकाला मोठा प्रतिसाद मिळाला़ जाईल तिथे हे नाटक गर्दी खेचत होते़ काम करतानाही समाधान मिळत असल्याने नाट्यक्षेत्रावरच मी लक्ष केंद्रित केले़ थिएटरला चिटकवून राहिलो़ म्हणूनच आज विविध नाटकांचे ११ हजार ८३८ हून अधिक प्रयोग करु शकलो़ रसिकांचे प्रेम लाभते आहे़ खरे तर रंगभूमी माझ्यासाठी आनंदसोहळा असल्याचे दिलखुलास मनोगत प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले़
विशाल सोनटक्के।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : १९९२ मध्ये ‘गेला माधव कुणीकडे?’ या नाटकाला मोठा प्रतिसाद मिळाला़ जाईल तिथे हे नाटक गर्दी खेचत होते़ काम करतानाही समाधान मिळत असल्याने नाट्यक्षेत्रावरच मी लक्ष केंद्रित केले़ थिएटरला चिटकवून राहिलो़ म्हणूनच आज विविध नाटकांचे ११ हजार ८३८ हून अधिक प्रयोग करु शकलो़ रसिकांचे प्रेम लाभते आहे़ खरे तर रंगभूमी माझ्यासाठी आनंदसोहळा असल्याचे दिलखुलास मनोगत प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले़
‘साखर खाल्लेला माणूस’ या नाट्यप्रयोगाच्यानिमित्ताने नांदेडमध्ये आल्यानंतर प्रशांत दामले यांनी सोमवारी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली़ याप्रसंगी ते बोलत होते़ नाटक हा माझ्यासाठी छंद आहे़ त्याचे व्यवसायात रुपांतर झाले असले तरी हे काम माझ्यावर कुणी लादलेले नाही़ त्यामुळेच काम करताना मला दमायला किंवा कंटाळायला होत नाही़ खरेतर रंगभूमी म्हणजे दररोजचे मतदान, दरररोजची निवडणूक़ दूरचित्रवाणीवरील मालिका, सिनेमाचे तसे नाही़ चित्रपट टी़व्ही़ मालिका या कलाकारापेक्षा दिग्दर्शकाचे माध्यम आहे़ तर नाटकात लिखाण झाल्यानंतर ही कलाकृती टीमकडे सुपूर्द होते़ रंगभूमी हे जिवंत माध्यम असल्याने मी त्यात अधिक रमतो़ नाटकाच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरायला मिळते़ नुकतेच सुरु असलेले ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाच्या निमित्ताने आज सगळीकडे फिरतो आहे़ या नाटकाचे आठ परदेश दौरे झाले आहेत़ इतर कुठल्याही नाटकाला हे करता आलेले नाही़ हे नाटक घेवून अगदी मी ‘टोकियो’ ला जावून आल्याचेही ते म्हणाले़
शहरी भागात नाटक केंद्रित झाले़ असा आक्षेप असतो़ मात्र नाटकासाठी आवश्यक पायाभूत सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध नसतात़ केवळ एवढ्याच कारणामुळे तेथे नाटक घेवून जाता येत नाही़ अन्यथा आम्हा कलाकारांना शहराबरोबरच ग्रामीण भागातही जाण्याची इच्छा असते़ राज्यात जिथे नाटक घेता येवू शकतात अशी ८३ ठिकाणे आहेत़ मात्र त्यातील फक्त एकाचा थिएटरमध्ये उत्तम प्रयोग करता येवू शकतो़ असे सांगत दामले यांनी राज्यातील नाट्यगृहाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले़ अनेक शहरातील नाट्यगृहे आज नादुरुस्त अवस्थेत आहेत़ साधी स्वच्छतागृहेही ठिकठाक नसतात़
मध्यंतरी औरंगाबाद येथील एका नाट्यगृहात आमच्या नाटकाच्या टीमला स्वच्छता करावी लागल्याचे त्यांनी सांगितले़ नाट्यप्रयोगासाठी येणारा खर्चही अलीकडील काळात वाढला आहे़ वाहनांपासून निवास, जेवण, भत्ते आदी सर्व बाबी महागल्याने नाटक घेवून जाताना़ त्यासाठी प्रेक्षक किती मिळेल हाही विचार करावा लागतो़ मी चिवट आहे़ त्यामुळे दौरे करतो; पण ते सगळ्यांनाच जमेल असे नाही़ असेही त्यांनी सांगितले़ वेळेचे उत्तम व्यवस्थापन याकडे माझा नेहमीच कटाक्ष असतो़ सुमारे १२ हजार प्रयोगांपैकी आजवर केवळ दोनच प्रयोग रद्द करण्याची माझ्यावर वेळ आली़ विशेष म्हणजे माझे सर्व नाट्यप्रयोग वेळेवर सुरु होतात़ असेही त्यांनी आवर्जून सांगितले़
गंभीर विषय विनोदीपद्धतीने प्रेक्षकांसमोर
सध्याचे युग स्पर्धेचे आहे़ त्यामुळे प्रत्येकजण कुठले ना कुठले ध्येय घेवून धावताना दिसतो़ हे लक्ष्य गाठताना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत होणारी धावाधाव त्यातून स्वत:कडे व कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष त्यातून उद्भवणाºया व्याधी हा अत्यंत गंभीर विषय ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाच्या माध्यमातून विनोदीपद्धतीने प्रेक्षकांसमोर आणला आहे़ खरेतर अलीकडील काळात एकमेकांसोबतचा संवाद कमी झाला आहे़ त्यातून गैरसमज, चिडचिड होते़ मात्र हा त्रागा किती चुकीचा आहे़ हे या नाटकाच्या माध्यमातून मांडल्याचे अभिनेते प्रशांत दामले यांनी सांगितले़ नाटक हे टीमवर्क असते़ प्रत्येक नाटकाच्या संहितेत मोकळीक असते़ या जागा शोधायचे काम दिग्दर्शक, कलाकारांचे असते, असेही दामले यावेळी म्हणाले़