बरडशेवाळा येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील अंत्यसंस्कार होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:47 AM2018-04-11T00:47:10+5:302018-04-11T00:47:10+5:30
बरडशेवाळा येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील स्मशानभूमी बंद करण्यासाठी ग्रामपंचायतने विशेष ग्रामसभा घेवून तसा ठराव पारित करावा, याची प्रत मनाठा पोलीस ठाण्याला देण्यात यावी, अशी सूचना पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने ग्रामपंचायतीला केली आहे़ त्यामुळे शाळेसमोर असलेली ही स्मशानभूमी आता बंद होणार आहे़
सुनील चौरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : बरडशेवाळा येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील स्मशानभूमी बंद करण्यासाठी ग्रामपंचायतने विशेष ग्रामसभा घेवून तसा ठराव पारित करावा, याची प्रत मनाठा पोलीस ठाण्याला देण्यात यावी, अशी सूचना पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने ग्रामपंचायतीला केली आहे़ त्यामुळे शाळेसमोर असलेली ही स्मशानभूमी आता बंद होणार आहे़
‘लोकमत’मध्ये या संदर्भातील वृत्त १० एप्रिल रोजी प्रसिद्ध होताच खळबळ उडाली़ शाळेला संरक्षक भिंत का देण्यात आली नाही? अशी विचारणा गटशिक्षणाधिकारी रुस्तुमराव ससाणे यांनी संबंधितांकडे केली़ बालविकास प्रकल्प अधिकारी जी़जी़ गिरगावकर यांनी स्वतंत्र पत्र ग्रामपंचायतच्या नावाने काढून स्मशानभूमीची जागा इतर ठिकाणी बदलण्यात यावी, अशी सूचना केली़ ग्रामसेविका जी़ए़ मोरे यांनी सांगितले, यासंदर्भात ग्रामपंचायतीची एक-दोन दिवसांत बैठक घेवून तसा ठराव घेण्यात येईल़ तसेच स्मशानभूमीमुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये याकडेही लक्ष देण्यात येईल़
ग्रामस्थ व्यंकटराव बेंबकर, अशोकराव माने, संतोषराव मस्के, प्रमोद पोटबांधे यांनी लोकमतच्या वृत्ताचे स्वागत करून स्मशानभूमी इतरत्र हलवावी अशी मागणी केली आहे़
दरम्यान, मंगळवारी दिवसभर शिक्षण विभागासह तहसील कार्यालयाचे अधिकारी स्मशानभूमीच्या विषयावरुन बैठका घेत होते़ त्यामुळे हा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे़