शिवाजीनगरात आगीत जळून फर्निचरचे दुकान खाक; व्यापाऱ्याचे लाखोंचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 03:23 PM2023-05-18T15:23:28+5:302023-05-18T15:24:56+5:30
१८ मे रोजी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास या दुकानातून आगीचे लोट बाहेर येत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले.
नांदेड : शहरातील शिवाजीनगर भागातील एका फर्निचरच्या दुकानाला आग लागल्याची घटना १८ मे रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यात दुकानातील फर्निचर जळून खाक झाले. शिवाजीनगर भागात एमआयडीसीची औद्योगिक वसाहत असून, या ठिकाणी जमीर अहमद सागर अहमद यांचे जमीर फर्निचर वर्क्स हे दुकान आहे. १८ मे रोजी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास या दुकानातून आगीचे लोट बाहेर येत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. ही माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली.
अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक विभागाचे घोरपडे, साजिद, लांडगे, खेडकर, बादेवाड, सावळे, सूर्यवंशी, ठाकूर, ताटे, टारपे, शिरेवार आदी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पाच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले, अशी माहिती अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे यांनी दिली. या आगीत सागवानाच्या फळ्या, साजवानी लाकडे जळून एकूण सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.
गुरुवारी आगीचे आणखी एक घटना घडली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर भागातीलच आधार हॉस्पिटल येथे आग लागली होती. अग्निशमन विभागाने या आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत दवाखान्यातील एसी जळून खाक झाला आहे.