भोकर तालुक्यात ७५७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:16 AM2021-01-17T04:16:15+5:302021-01-17T04:16:15+5:30

भोकर : तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या ३३३ सदस्य पदांकरिता निवडणूक रिंगणात उभे असलेल्या ७५७ उमेदवारांचे भवितव्य ४७ हजारांपेक्षा अधिक ...

Future of 757 candidates in Bhokar taluka closed in EVM machine | भोकर तालुक्यात ७५७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद

भोकर तालुक्यात ७५७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद

googlenewsNext

भोकर : तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या ३३३ सदस्य पदांकरिता निवडणूक रिंगणात उभे असलेल्या ७५७ उमेदवारांचे भवितव्य ४७ हजारांपेक्षा अधिक मतदारांनी ईव्हीएम यंत्राद्वारे मतदानाचा हक्क बजावून सीलबंद केले आहे. गावपुढाऱ्यांच्या चुरशीमध्ये काही गावात झालेला किरकोळ वाद वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

तालुक्यातील ६६ पैकी ६३ ग्रामपंचायतींच्या ५१३ सदस्य पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, मतदान प्रक्रियेविना १२ ग्रामपंचायतींचे व विविध प्रभागातील १५ असे एकूण १७० सदस्य बिनविरोध निवडून आले तर अनुसूचित जमातीच्या १० जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्या जागा रिक्त आहेत. यामुळे उर्वरित ५१ ग्रामपंचायतींच्या ३३३ सदस्य पदांसाठी १४१ मतदान केंद्रांवर ईव्हीएम यंत्राद्वारे ५६४ कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने मतदान प्रक्रिया घेण्यात आली. नियोजित वेळेत पार पडलेल्या मतदानादरम्यान मतदान केंद्रावर नवमतदार, महिला, वृद्ध मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी उमेदवारांसह पॅनेलप्रमुख मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांची विनवणी करत होते, तर काही मतदार स्वयंस्फूर्तीने मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा उत्सव साजरा करत होते.

भोकर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत २७ हजार ५७७ स्त्रिया व २८ हजार ९३७ पुरुष असे एकूण ५६ हजार ५१४ मतदार होते. त्यातील स्त्रिया २२ हजार ७९३ व पुरुष २४ हजार ४३७ असे एकूण ४७ हजार २३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण ८३ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उपविभागीय अधिकारी तथा तालुका समन्वयक राजेंद्र खंदारे, तहसीलदार तथा निवडणूक प्राधिकरण अधिकारी भरत सूर्यवंशी, नायब तहसीलदार संतोष कामठेकर, सुनील पांडे, रेखा चामनार, पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडली.

चौकट-

तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भोसी, किनी, रावणगाव, रायखोड, हळदा, सायाळ, बटाळा आदी गावांमध्ये चुरशीची लढत झाली तर हस्सापूर, चितगिरी, कामनगाव, जामदरी येथे परस्परविरोधी गट आमने-सामने आल्याने गावात तणाव निर्माण झाला होता.

Web Title: Future of 757 candidates in Bhokar taluka closed in EVM machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.