माध्यमशास्त्र संकुलातील विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला
By admin | Published: February 13, 2015 03:14 PM2015-02-13T15:14:49+5:302015-02-13T15:14:49+5:30
स्वारातीम विद्यापीठाच्या माध्यम संकुलातील अध्यापनासाठी पात्रताधारक प्राध्यापकांऐवजी कार्यालयीन कामकाज करणार्या कर्मचार्यांच्या हाती विद्यार्थ्यांचे भविष्य सोपविण्यात आले आहे.
नांदेड: स्वारातीम विद्यापीठाच्या माध्यम संकुलातील अध्यापनासाठी पात्रताधारक प्राध्यापकांऐवजी कार्यालयीन कामकाज करणार्या कर्मचार्यांच्या हाती विद्यार्थ्यांचे भविष्य सोपविण्यात आले आहे. त्यामुळे या संकुलातील विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
विद्यापीठातंर्गत माध्यम संकुलातील इलेक्ट्रॉनिक मिडिया या पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची अवस्था भरकटल्यासारखी झाली आहे. दोन वर्षाच्या या अभ्यासक्रमाचे प्रथम सत्र नुकतेच संपले आहे. परंतु हे सहा महिने प्रशासकीय कामकाज करणार्या कर्मचार्यांनेच त्यांचे तास घेतले. त्यामुळे या काळात हे विद्यार्थी नेमके काय शिकले? हा संशोधनाचा विषय आहे. तांत्रिक विभागातील या कर्मचार्याने आपल्या अधिकाराचा वापर करून अनेकांना कोंडीत पकडले आहे.
विद्यापीठ प्रशासनाने या कर्मचार्याला केवळ अध्यापनासाठीच नव्हे तर पेपर तपासणीसाठी तसेच बहिस्थ परिक्षक अशा अतिशय महत्वाच्या कामावर नियुक्त केले हे विशेष. इलेक्ट्रॉनिक विभागात इतर प्राध्यापक सुद्धा पात्रताधारक नसल्यामुळे भावी पत्रकारांचे आयुष्य अंधकारमय असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या. या संकुलाचे प्रमुख मात्र या सर्व प्रकाराबाबत धृतराष्ट्राची भूमिका घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थीच संभ्रमात आहेत.
या संकुलातील गैर प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांच्या छळाच्या घटना वाढत असल्याची तक्रार एसएफआय या विद्यार्थी संघटनेने केली आहे. या सकुंलातील विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या एक कोटी साहित्याचा उपयोग होत नसल्याचा व पूर्णवेळ प्राध्यापक तासिका घेत नसल्याचा आरोपही संघटनेच्या वतीने केला आहे.
संबंधित प्राध्यापकांच्या चौकशीची मागणी करून विद्यार्थ्यांसाठी पूर्णवेळ पात्रताधारक प्राध्यापक नियुक्त करावेत, अशी मागणी एसएफआयचे राज्य उपाध्यक्ष बालाजी कलेटवाड, विकास वाठोरे, सचिन खडके, अविनाश घाडगे, देवा खाडे, सुमेध सदावर्ते यांनी केली आहे. /(प्रतिनिधी)