मराठवाड्यातील गजानन भक्तांना रेल्वे बोर्ड पावले; ३ रेल्वे गाड्यांना शेगाव येथे थांबा
By प्रसाद आर्वीकर | Published: March 24, 2023 12:05 PM2023-03-24T12:05:06+5:302023-03-24T12:07:11+5:30
रेल्वे बोर्डाने प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यासाठी हा बदल केला आहे.
नांदेड : केंद्रीय रेल्वे बोर्डाने तीन रेल्वे गाड्यांना शेगाव येथे थांबा मंजूर केला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील संत श्री गजानन महाराज भाविकांची गैरसोय दूर होणार आहे.
मराठवाड्यातून श्रीक्षेत्र शेगाव येथे संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे; परंतु शेगाव मार्गे धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना शेगाव येथे थांबा नसल्याने भाविकांचे गैरसोय होत होती. २१ मार्च रोजी रेल्वे बोर्डाने चार रेल्वे गाड्यांचे थांबे निश्चित केले आहेत. त्यामध्ये तीन रेल्वे गाड्यांना शेगाव येथे थांबा दिला आहे. नांदेड- अमृतसर (अमृतसर एक्स्प्रेस १२४२१/२२), नांदेड- जम्मूतावी एक्स्प्रेस (१२७५१/५२) आणि नागपूर- पुणे एक्स्प्रेस (२२१४१/४२) या रेल्वे गाड्यांना शेगाव येथे थांबा मंजूर केला आहे. रेल्वे बोर्डाने प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यासाठी हा बदल केला आहे. या बदलामुळे नांदेड विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची रेल्वेने शेगाव येथे जाण्याची सुविधा झाली आहे.