राज्यात शिक्षणाचा खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:57 AM2018-10-15T00:57:21+5:302018-10-15T00:58:13+5:30
शिक्षकांचा प्रश्न असो की शिक्षण क्षेत्राबाबतचा निर्णय असो केवळ जीआर काढण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. या शासनाने पूर्ण शिक्षणक्षेत्राचा खेळखंडोबा केला असल्याचे मत माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देगलूर : शिक्षकांचा प्रश्न असो की शिक्षण क्षेत्राबाबतचा निर्णय असो केवळ जीआर काढण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. या शासनाने पूर्ण शिक्षणक्षेत्राचा खेळखंडोबा केला असल्याचे मत माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात १४ आॅक्टोबर रोजी जिल्हा व तालुकास्तरीय गुरूगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. विक्रम काळे, आ. सुभाष साबणे, आ. अमर राजूरकर, आ.डी. पी.सावंत, आ. वसंतराव चव्हाण, माजी आ. रावसाहेब अंतापूरकर, माजी आ. गंगाराम सौदागर, जि. प. उपाध्यक्ष समाधान जाधव, सभापती माधवराव मिसाळे, पं. स. सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर, नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष शंकरराव कंतेवार, जि. प. सदस्य अॅड. रामराव नाईक, अनुराधा अनिल पाटील खानापूरकर, दिलीप धोंडगे, प्रकाशराव भोसीकर, शेषराव चव्हाण, गटविकास अधिकारी गंगाधर मेथेवाड, उपनगराध्यक्ष बालाजी टेकाळे, दीपक शहाणे आदींची उपस्थिती होती.
माजी मुख्यमंत्री खा. चव्हाण म्हणाले, विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षकांवरच असते मात्र शासन दरबारी शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शिक्षणाचे खाजगीकरण, कायम विनाअनुदानित शाळेचा प्रश्न व जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न याबाबत चव्हाणांनी शासनाला धारेवर धरले. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून केली जात आहे. याकडे सध्याच्या शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन यातून मार्ग काढावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. शालेय अभ्यासक्रमात छत्रपती संभाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापण्याचा उद्योग मधल्या काळात झाला, त्याचा मी जाहीर निषेध करतो. तसेच ज्यांनी हे छापून आणले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे़ नांदेड जिल्ह्याची आणेवारी ५० पैशांच्या वर दाखवण्यात आली. ही चिंताजनक बाब असून शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. शासनाने नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा घोषित करण्याची मागणी चव्हाण यांनी यावेळी केली. सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले़ देगलूर तालुक्यातील ३० तर जिल्ह्यातील ३४ शिक्षकांना गुरू गौरव पुरस्काराने यावेळी सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.
शालेय अभ्यासक्रमात आक्षेपार्ह मजकुराचा निषेध
शालेय अभ्यासक्रमात छत्रपती संभाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापण्याचा उद्योग मधल्या काळात झाला त्याचा मी जाहीर निषेध करतो. तसेच ज्यांनी हे छापून आणले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. असे स्पष्ट करीत पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच मराठवाडा सध्या दुष्काळाने होरपळत आहे. नांदेड जिल्ह्याची ५० पैशांच्यावर आणेवारी दाखवण्यात आली ही चिंताजनक बाब असून शेतक-यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. शासनाने नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा घोषित करण्याची मागणी चव्हाण यांनी यावेळी केली.