रेल्वेचे बनावट नियुक्तीपत्र देऊन गंडविणारी टोळी अटकेत; देशभरात १० वर्षांपासून सक्रीय होते रॅकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 07:29 PM2021-06-21T19:29:23+5:302021-06-21T19:31:20+5:30
देशभरात सक्रीय असलेल्या टोळीचा हिंगोली पोलिसांनी भांडाफोड केला आहे.
नांदेड- सुशिक्षत तरुणांना हेरुन नोकरीचे आमिष दाखवित लाखो रुपयांना गंडविणारी आणि देशभरात सक्रीय असलेल्या टोळीचा हिंगोली पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या प्रकरणात अनेक राज्यातून सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे शंभरहून अधिक नियुक्तीपत्रे यासह इतर साहित्य आढळून आले. या टोळीने आतापर्यंत बनावट नियुक्तीपत्र देवून शेकडो जणांची फसवणुक केली आहे. अशी माहिती विशेष पोलिस महानिरिक्षक निसार तांबोळी यांनी दिली.
पंढीत ढवळे यांनी वसमत पोलिस ठाण्यात १३ मे २०२१ रोजी संतोष बनवारीलाल सरोज रा.बाडेपूर जि.जोनपूर याच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यात ढवळे यांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवित सरोज याने दहा लाख रुपयांनी फसविल्याचे नमूद केले होते. तसेच आरोपींनी अशाचप्रकारे अनेकांना गंडविल्याचेही ढवळे यांनी पोलिसांना सांगितले. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता विशेष पोलिस महानिरिक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक एम.राकेश कलासागर, अप्पर अधीक्षक यशवंत काळे, पोलिस उपाधीक्षक यतीश देशमुख यांनी दोन पथके तयार केली. स्थागुशाचे पोउपनि शिवसांब घेवारे, पोशि.किशाेर कातकडे, विठ्ठल काळे, जयप्रकाश झाडे व वसमतचे सपोनि बोधनापोड, संदीप चव्हाण, रवि ठेंबरे, विवेक गुंडरे, बालाजी वडगावे यांचा त्यात समावेश हाेता. पोलिसांनी ९ जून रोजी नांदेड रेल्वेस्टेशन परिसरातून रविंद्र दयानिधी संकुवा रा.ओडीसा, ॲड.नरेंद्र विष्णूदेव प्रसाद रा.लयरोपरुवार मध्यप्रदेश यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत या प्रकरणाची व्याप्ती देशभरात असल्याचे लक्षात आले.
आरोपींनी नांदेड, मुंबई, दिल्ली व लखनऊ यासह अनेक ठिकाणी तरुणांना बोगस नियुक्ती पत्र दिले होते. सायबर सेलच्या माध्यमातून ११ जून रोजी नांदेड शहरातून सतिष तुळशीराम हंकारे रा.बोरगाव ता.लोहा, आनंद पांडूरंग कांबळे रा.अहमदपूर यांना अटक केली. हे दोन्ही आरोपी नांदेडला पोलिस भरती प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून बेरोजगारांना हेरत होते. १३ जून रोजी पोलिसांनी मुंबई येथून गौतम एकनाथ फणसे याला अटक केली. त्याने मुंबईत अनेकांना गंडविल्याची कबुली दिली. दिल्ली येथून अभय मेघशाम रेडकर याला पकडले. त्याच्याकडून संतोष कुमार सरोजची माहिती मिळाली. लखनऊ येथे लपून बसलेल्या सरोजला एका लॉजमधून अटक केली. त्याच्याकडून मंत्रालयातील सचिव दर्जाच्या अधिकार्यांच्या नावे बनावट स्टॅम्प, नियुक्तीपत्र, भारत सरकार व उत्तर प्रदेश सरकार यांची नावे असलेले लिफाफे, बनावट ओळखपत्र यासह इतर साहित्य मिळाले. पोलिसांनी आरोपींची १८ बँक खाती सील केली आहेत. नगदी ५६ हजार, कार, सात मोबाईल असा एकुण २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दहा वर्षापासून चालवित होते रॅकेट
आरोपी हे गेल्या दहा वर्षापासून हे रॅकेट चालवित होते. महाराष्ट्र, ओडीसा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पश्चिम बंगाल यासह इतर राज्यातील बेरोजगार तरुणांची त्यांनी कोट्यवधी रुपयांनी फसवणुक केली आहे.