नांदेड जिल्ह्यातील ५० दुकाने फोडणारी टोळी जेरबंद; दुकानाचा पत्रा कापून करायचे माल लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 02:36 PM2018-10-25T14:36:32+5:302018-10-25T14:39:07+5:30

टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली असून या चोरट्यांनी जिल्ह्यातील सुमारे ५० दुकाने फोडल्याची कबुली दिली आहे़ 

A gang arrested has robbed 50 shops in Nanded district | नांदेड जिल्ह्यातील ५० दुकाने फोडणारी टोळी जेरबंद; दुकानाचा पत्रा कापून करायचे माल लंपास 

नांदेड जिल्ह्यातील ५० दुकाने फोडणारी टोळी जेरबंद; दुकानाचा पत्रा कापून करायचे माल लंपास 

Next
ठळक मुद्देया टोळीतील तिघे अटकेत दुकानाचा पत्रा कापून माल लंपास करणारी टोळी जेरबंद

नांदेड : मागील सात ते आठ महिन्यांत नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी दुकानाचा पत्रा कापून आतमधील माल लंपास केला जात होता़ या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे़ टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली असून या चोरट्यांनी जिल्ह्यातील सुमारे ५० दुकाने फोडल्याची कबुली दिली आहे़ 

नांदेड शहर व मुदखेड येथील मुख्य बाजारपेठेतील दुकानाच्या वरील टीन पत्रे काढून दुकानातील माल लंपास करण्याच्या घटना मागील सात ते आठ महिन्यांत मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या़ या चोरट्यांनी अशा पद्धतीने बाजारपेठेत हैैदोस मांडल्याने व्यापाऱ्यांसह पोलिसांसमोरही या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे टाकले होते़ या चोरट्यांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पी़डी़ भारती यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले होते़ 

२४ आॅक्टोबर रोजी हे पथक एका प्रकरणाच्या चौकशीसाठी लातूर येथे गेले असता नांदेड जिल्ह्यात होणाऱ्या दुकानफोडीतील आरोपीबाबतची माहिती पथकाला मिळाली़ निजामाबाद येथील श्रीनिवास उर्फ सिनू हा त्याचा साथीदार शेख फारूख याच्यासह सध्या लातूरमध्ये राहत असून त्याच्याच टोळीने नांदेड शहर तसेच मुदखेडमध्ये चोऱ्या केल्याचे समजले़ 

या माहितीवरून लातूर अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेसमोरून चौक क्रमांक ५ परिसरात पोलिसांनी सापळा रचून तेथे थांबलेल्या श्रीनिवास उर्फ सिनू राजेश्वर करपे (वय २२, रा़निजामाबाद, हल्ली मु़ आबादी, पाठ गल्ली उमरी), सय्यद यासीन सय्यद याकुब (वय ३१, रा़जयनगर, हनुमान मंदिर समोर, लातूर) आणि शेख फारूख शेख मोहम्मद उर्फ सलीम (वय २१, रा़चोंडेश्वर, ता़लातूर) या तिघांना ताब्यात घेतले़ या तिघांना पोलिस खाक्या दाखवून चौकशी केली असता त्यांनी मागील सात ते आठ महिन्यांत नांदेड जिल्ह्यातील मुदखेडसह इतवारा, वजिराबाद भागात सुमारे पन्नासावर दुकानांचे टीनपत्रे कापून दुकानात प्रवेश केल्याचे आणि दुकानातील ऐवज लांबविल्याची कबुली दिली़ 

दरम्यान, या आरोपींकडून १४ गुन्हे उघडकीस आले असून आरोपीविरोधात तेलंगणातील निजामाबाद येथेही घरफोडीचे गुन्हे दाखल असून श्रीनिवास उर्फ सिनू करपे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे तपासातून पुढे आले आहे़ स्थानिक गुन्हे शाखेने या आरोपींना मुदखेड पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ सदर कामगिरी पोलिस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ़अक्षय शिंदे, पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पी़डी़भारती, रमेश खाडे, महेश कुलकर्णी, ब्रह्मानंद लामतुरे, व्यंकट गंगुलवार, शेख जावेद, गजानन वयनवाड, रवि वावर आदींनी पार पाडली़  

Web Title: A gang arrested has robbed 50 shops in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.