गणपूर दरोड्यातील टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:44 AM2018-11-30T00:44:25+5:302018-11-30T00:45:09+5:30
चाकू व कोयत्याने हल्ला करुन घरातील दागिणे, रोख रक्कम असा एकूण १ लाख ११ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नांदेड : चाकू व कोयत्याने हल्ला करुन घरातील दागिणे, रोख रक्कम असा एकूण १ लाख ११ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. अर्धापूर ठाण्यात सदर घटनेप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अर्धापूर तालुक्यातील गणपूर येथे संभाजी एकनाथ मोहिते यांच्या घराचा दरवाजा तोडून १६ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच जणांनी चाकुने हल्ला करत १ लाख ११ हजार रुपयांचा लंपास केला होता. या प्रकरणाच्या तपासात २८ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हा शाखेला माहिती मिळाली. माधव मोहिते आणि चांदू मोहिते यांचा या दरोड्यात सहभाग होता. या माहितीवरुन पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे यांनी सहायक पोलिस निरीक्षक पी.डी. भारती व अन्य कर्मचाºयांचे एक पथक तयार केले. या पथकाने आरोपींचा नांदेड, पुणे तसेच चंद्रपूर जिल्ह्यात शोध घेतला. या दरोड्यातील माधव उर्फ रवि संभाजी मोहिते (वय २४, रा. पळसगाव ता. वसमत), सचिन भास्कर जाधव (वय २३, रा. पिंपळशेंडा जि. वाशिम), मो. रियाज मो. अली (वय २४, रा. आसाम) या तिघांना चंद्रपूर येथून आणि सारंग शंकर गोदरे (वय २७, रा. गणपूर ता. अर्धापूर) याला गणपूर येथून ताब्यात घेतली. त्यांची विचारपूस केली असता सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या दरोड्यातील चांदू मोहिते हा आंतरराज्य टोळीतील आहे. त्याचा एक साथीदार लक्ष्मण मेटकर याला दोन महिन्यापूर्वीच स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून नांदेड जिल्ह्यातील २ आणि तेलंगणा राज्यातील १२ दरोड्याचे गुन्हे उघडकीस आले होते. पोलिसांनी पकडलेल्या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचेही पोलिस अधीक्षक जाधव म्हणाले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे, सहायक पोलिस निरीक्षक पी.डी. भारती यांची उपस्थिती होती.
गुप्तधनाच्या लालसेतून जवळच्यांनीच रचला डाव
गणपूर येथील संभाजी मोहिते यांना गुप्तधन सापडल्याची चर्चा होती. याच गुप्तधनाच्या लालसेतून गावातीलच सारंग गोदरे याने गुप्तधनाच्या लालसेने दरोड्याचा कट रचला होता. त्याने दिलेल्या माहितीवरुनच माधव संभाजी मोहिते, सचिन जाधव, मोहमद रियाज यांनी १६ नोव्हेंबर रोजी दरोडा टाकला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.