शाळेतही तयार झाल्या गँग; नववीतील विद्यार्थ्यांच्या दप्तरात खंजर अन् एअर गन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 01:58 PM2023-03-25T13:58:33+5:302023-03-25T14:28:54+5:30
पालकांनो, सावधान ! शिक्षकांना संशय आल्यानंतर घेतली झाडाझडती
नांदेड : पूर्वी बिहार, उत्तर प्रदेशातून पिस्तूल आणि गावठी पिस्तूलसह तत्सम हत्यारे मागविली जायची. परंतु, आता नांदेडातच गावठी पिस्तूल सहजपणे मिळत आहे. त्यातही पिस्तूलासारखे दिसणाऱ्या एअर गनचाही वापर वाढला आहे. अवघ्या तीन हजार रुपयांत शाळकरी मुलांनी या एअर गन खरेदी केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
शिक्षकांना संशय आल्यानंतर नववीतील विद्यार्थ्यांची झडती घेतली असता, दप्तरात चार खंजर अन् एअरगन आढळली. त्यामुळे शिक्षकही अव्वाक झाले.
नांदेड जिल्हा दिवसेंदिवस गुन्हेगारी आणि गोळीबाराच्या घटनांनी चर्चेत येत आहे. त्यात वेगवेगळ्या गँगचे नांदेडमधील गुंड, गुन्हेगारांशी असलेले संबंध येथील कायदा व सुव्यवस्थेला हानी पोहोचवणारेच आहेत. नांदेडमध्ये कुणालाही खंजर, तलवार सहज उपलब्ध होते हे सर्वश्रूत आहे. परंतु, आता गावठी पिस्तूलही तेवढ्याच सहजतेने मिळत आहे. तर काही जण एअर गनद्वारे लुटमार करीत आहेत. त्यामध्ये अल्पवयीन मुलेही असल्याचे पुढे आले आहे. त्यातच आता शहरातील एका नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता.
एका गटाकडे खंजर असल्याने दुसऱ्या गटातील मुलांनीदेखील खंजर विकत घेतले. पुढे जाऊन त्यातील एका गटातील विद्यार्थ्यांनी खाऊला दिलेले पैसे जमा करून छऱ्यांची बंदूक विकत घेतली. त्या बंदुकीच्या माध्यमातून शाळेत आपली दादागिरी चालविली. विद्यार्थ्यांच्या हाती छऱ्यांची बंदूक आणि खंजर आल्याचे कळताच शाळा प्रशासनाने पालकांना बोलावले. घडलेला प्रकार सांगितला. तर त्यातून धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. शंभर रुपयांना खंजर विकत घेतले, त्यानंतर तीन हजार रुपयांमध्ये छऱ्याची बंदूक खरेदी केली. दररोज ही मुले दप्तरात खंजर आणि खेळण्यातील एअर गन बाळगत होते. हा प्रकार ऐकून पालकांच्या पायाखालची वाळू सरकली अन् त्यांना घाम फुटला. यातील बहुतांश विद्यार्थी सुशिक्षित कुटुंबातील आहेत हे विशेष. उच्चभ्रू सोसायटीतील विद्यार्थ्यांची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळेत हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
पालकांनो, सावधान !...
खंजर, छऱ्यांची बंदूक विकत घेणारे हे विद्यार्थी उच्चशिक्षित कुटुंबातील आहेत. या विद्यार्थ्यांचे घरातील वागणे, बाेलणे आणि समाजातील वावर अतिशय चांगला आणि स्तुतीयोग्य राहिला.घरात येणाऱ्यांना आदराने बोलणे, अभ्यासात हुशार असणे. त्यामुळे पालकांना त्यांच्याकडून केलेल्या कृतीची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यासह शिक्षकही अवाक झाले.
गिफ्ट देणार हाेते कट्टा
विद्यार्थ्यांनी एक-एक हजार रुपये जमा करुन आपल्या वर्ग मित्राला वाढदिवसानिमित्त १५ हजार रुपयांचा देशी कट्टा गिफ्ट म्हणून देण्याची योजनाही आखली होती. परंतू त्यापूर्वीच त्यांचे बिंग फुटले.
शाळेतही तयार झाल्या गँग
साधारणता आठवी ते नववीतील विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरुन भांडणे झाल्यानंतर त्याचे रुपांतर दोन गटात होत आहे. सिनेमा, वेब सिरीज आणि थ्रीलिंग गेम पाहून या विद्यार्थ्यांची वृत्ती हिंसक होत चालली आहे. त्यातून समोरच्यावर वर्चस्व मिळविण्यासाठी ते खंजर, सायकलची चैन, ब्रेक वायर, एअरगन अशी हत्यारे वापरत आहेत.