लोकहो जरा होशियार... येत आहेत ढोल-ताशांचे राजकुमार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 08:00 PM2022-12-13T20:00:11+5:302022-12-13T20:10:22+5:30

प्राथमिक शाळेचे शिक्षक गौरव शिंदे यांच्या नेतृत्त्वात तयार होत असलेल्या शिवनवयुग ढोल-ताशा-ध्वज पथकाची सुरुवात नोव्हेंबर २०२२ पासून झाली आहे.

Gaurav Shinde Shivanavyug Dhol-Tasha-Dhwaj Team in nagpur | लोकहो जरा होशियार... येत आहेत ढोल-ताशांचे राजकुमार!

लोकहो जरा होशियार... येत आहेत ढोल-ताशांचे राजकुमार!

Next

प्रवीण खापरे

नागपूर - ढोल-ताशा हे महाराष्ट्राचे पारंपारिक वाद्य आहे आणि या वाद्यांचा केशरी ध्वजासह होणारा नाद शिवशाहीचा आभास घडविणारा ठरतो. हे ढोल-ताशा बडविणारे पथक ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची श्रीमंती व्यक्त करते आणि युवक-युवतींनी भरलेली, समृद्ध वाद्यजंत्रा असणारी अशी अनेक पथके महाराष्ट्रात आहेत. आता यात भर बालकांच्या पथकाची पडली असून, ढोल-ताशा बडविताना त्यांचा वकूब, तालावर डोलणारी त्यांची देहयष्टी, त्यांच्या चेहऱ्यावर आपसुकच उमटणारी रौद्र छटा आणि आसमंत भेदणारी नादमयी ललकारी... या बालकांना ढोल-ताशांच्या जगतात राजकुमार ठरवितात. विशेष म्हणजे, बालकांचा हा ढोल-ताशा-ध्वज पथक भारतातील एकमेव आहे.

प्राथमिक शाळेचे शिक्षक गौरव शिंदे यांच्या नेतृत्त्वात तयार होत असलेल्या शिवनवयुग ढोल-ताशा-ध्वज पथकाची सुरुवात नोव्हेंबर २०२२ पासून झाली आहे. पहिली ते चवथी अर्थात ६ ते ९ वर्ष वयोगटातील एकूण ७५ मुले या पथकात सामिल करण्यात आली आहेत. सध्या वाद्यांच्या संख्येच्या अनुपातानुसार ही पथकातील मुलांची संख्या असून, येत्या काळात ही संख्या १५० वादकांपर्यंत नेण्यात येणार आहे. 

विशेष म्हणजे, एका महिन्यापूर्वी सुरू झालेले हे पथक २०२४ मध्ये दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या गणराज्य दिनाच्या सोहळ्याची तयारी करत आहेत. राजाबाक्षा येथील नवयुग प्राथमिक शाळेच्या पटांगणात या   पथकाचा सराव दररोज संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर होतो. गांधी टोपी, पांढरा कुर्ता-पायजमा, लाल रंगाचा शेला असा पथकातील मुलांचा तर एकाच रंगातील नववारी पातळ, नाकात नथ, केसांचा अंबाडा आणि गजरा अशी मुलींची वेशभूषा आहे. या पथकाचा सराव सुरू होताच उत्सुकतेपोटी शेजारील परिसरातील लोकांची गर्दी उसळलेली असते. केवळ कुमारवयीन मुलांचा हा पथक ढोल-ताशाच्या क्षेत्रात आपला डंका वाजविण्यास सज्ज झाला आहे.

ओडिशातून आले होते आमंत्रण
- आमच्या शिवनवयुग ढोल-ताशा-ध्वज पथकाला ओडीशा राज्यातून वादनासाठी आमंत्रण आले होते. परंतु, महिन्याभरापासूनच सुरू असलेला सराव आणि मुलांचे वय व त्यांची तयारी बघता हे आमंत्रण आम्ही नंतर स्विकारण्याची तयारी दर्शवली. या पथकाला भारतीय शिक्षण मंडळाने सहकार्य केले असून आमच्या शाळेचे मुख्याध्यापक अजय काळे यांच्या प्रोत्साहनाने मुले आणि मुलांमध्ये कुमार वयातच संस्कृती रक्षणाचे धडे देण्याच्या हेतूने या पथकाची सुरुवात झाली आहे.
- गौरव शिंदे, शिक्षक आणि पथक प्रमुख
 

Web Title: Gaurav Shinde Shivanavyug Dhol-Tasha-Dhwaj Team in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर