ओटीपी दिला अन् ८० हजार गेले, पण सायबर पोलिसांमुळे परतही मिळाले
By शिवराज बिचेवार | Published: August 19, 2023 06:32 PM2023-08-19T18:32:02+5:302023-08-19T18:32:45+5:30
सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी वेगवेगळे फंडे वापरत आहेत.
नांदेड- ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसांमध्ये वाढच होत आहे. त्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन फंडे वापरत आहेत. नांदेड शहरातील आनंद नगर भागात एका व्यक्तीला बँक खात्याला लिंक असलेले पॅन कार्ड अपडेट करायचे म्हणून ओटीपी मागण्यात आला. ओटीपी देताच संबधित व्यक्तीच्या खात्यातून ८० हजार ५०० रुपये वळते करण्यात आले. याबाबत लगेच विमानतळ आणि सायबर सेलकडे तक्रार केल्यानंतर तातडीने पावले उचलत ही रक्कम परत मिळविण्यास यश आले आहे.
मुंजाजी प्रकाशराव डाढाळे यांना अनोळखी क्रमांकावर फोन आला होता. तुमच्या ॲक्सीस बँक खात्याला लिंक असलेले पॅन कार्ड अपडेट करावयाचे आहे, असे समोरच्या व्यक्तीने सांगितले. तसेच डाढाळे यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी विचारला. डाढाळे यांनीही ओटीपी समोरील व्यक्तीला दिला. त्यानंतर डाढाळे यांच्या बँक खात्यातून ८० हजार ५०० रुपये काढल्याचा संदेश आला. त्यामुळे आपली कुणीतरी फसवणुक केल्याचे डाढाळे यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने विमानतळ आणि सायबर सेलकडे तक्रार केली. सायबर सेलने संबधित बँका वॉलेट यांचे नोडल अधिकारी यांना ईमेलद्वारे संपर्क साधण्यात आला. तसेच पाठपुरावा करुन डाढाळे यांची गेलेली ८० हजार ५०० रुपयांची रक्कम परत त्यांच्या खात्यात वळती करण्यात आली.
ओटीपी, वैयक्तिक माहिती देवू नका
सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी वेगवेगळे फंडे वापरत आहेत. त्यामुळे अनोळखी क्रमांकावर फोन आल्यानंतर त्यांना कोणतीही वैयक्तिक माहिती, ओटीपी देवू नये. लिंकही ओपन करु नये. फसवणुक झाल्यास तात्काळ संबधित पोलिस ठाणे आणि सायबर सेलशी संपर्क साधावा असे आवाहन पोनि.ओमकांत चिंचोलकर यांनी केले आहे.