गावरान कैरी दुर्मिळ; ‘तिरुपती’वर मदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:37 AM2019-06-16T00:37:28+5:302019-06-16T00:39:08+5:30
तालुक्यातील प्रसिद्ध गावरान आंबे नानाविध कारणाने दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळे परप्रांतीय आंब्यावर रसाळी करण्याचा प्रसंग ओढवला.
कंधार : तालुक्यातील प्रसिद्ध गावरान आंबे नानाविध कारणाने दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळे परप्रांतीय आंब्यावर रसाळी करण्याचा प्रसंग ओढवला. आता खास लोणचे घालण्याचा हंगाम आहे. परंतु तिरूपती कैरीवर लोणच्याची चव चाखण्याची वेळ आली असल्याचे चित्र समोर आले आहे.
तालुक्यातील बाचोटी, गोगदरी, फुलवळ, कुरूळा, गऊळ, फकिरदरावाडी, बारूळ, धर्मापुरी, मानसपुरी, शेकापूर, पानभोसी, चिंचोली, आंबुलगा आदी गावे, वाडी-तांड्यांवरील गावरान आंबे रसाळी व लोणच्याकरिता प्रसिद्ध होते. आपल्या खास रसाळ व गोड आस्वादाने या आंब्याला राज्यासह परप्रांतात मोठी मागणी असायची. अक्षय तृतीयाला पिकलेले आंबे रसाळीसाठी बाजारात दाखल होत असत. अशा वेळी खरेदीसाठी केवळ गावच्या नावावर झुंबड उडायची.
गत काही वर्षांपासून तालुक्यात सतत दुष्काळ पडत आहे. तापमान कमालीचे वाढत आहे. त्यामुळे एक हजारापेक्षा अधिक आंब्याचे वृक्ष वाळून गेले. त्यातच शिल्लक वृक्षाला आलेला मोहर हा कमाल तापमानाने करपला. पुन्हा अवकाळी पाऊस, वादळीवाऱ्याने कैरी झडून गेल्या. याचा परिणाम म्हणून गावरान आंबे दुर्मिळ झाले. बाजारात मोजके आंबे दाखल झाले. परंतु, आंध्र प्रदेश व कर्नाटक आंब्याचा बोलबाला राहिला. ऐंशी ते शंभर रुपये प्रतिकिलोने कलमी, रूमाली, नीलम, दसेरी, बदाम, केशर आदी पिकलेल्या आंब्याने बाजारपेठ काबीज केली आणि गावरान आंब्याची चव चाखणे दुरापास्त झाले. त्यातच लोणच्यासाठी तिरूपती आंबा बाजारात दाखल झाला. प्रतिकिलो ४० रुपयेप्रमाणे खरेदी करून लोणचे घालण्यासाठी शेतकरी, व्यापारी, नोकरदार सरसावला आहे.
किलोत ६ ते ७ कैºया बसतात
किलोत नाममात्र ६ ते ७ कैºया आकाराप्रमाणे बसतात. शहरी व ग्रामीण भागात आठ ते दहा महिने आहारात उपयोगात आणणारा व भोजनाची रंगत वाढवणारे लोणचे प्रसिद्ध आहे.कैरीची फोड करून धुवून घेऊन सुकविले जाते. मीठ, मिरची, हळद, मोहरी, गरम मसाला, लसूण आदींचे योग्य प्रमाणात मिश्रण करून विशिष्ट पद्धतीने गरम तेल थंड झाल्यावर त्यात हे सर्व मिसळून लोणचे घातले जाते. त्यामुळे लोणचे दीर्घकाळ टिकते. म्हणून गावरान कैरी लोणचे प्रसिद्ध आहे.
गावरान कैरी खरेदी करून विक्री करण्याचा हा हंगामी व्यवसाय केला जातो. आता कैरी तशी दुर्मिळ झाल्याने परराज्यातील कैरी आणून विक्री करावी लागत आहे. चॉंद बागवान, समद बागवान, खय्युम बागवान आदी जण यात आहेत. कमाई कमी व ओढाताण जास्त असा प्रकार होत आहे. परवडत नसले तरी पूर्वीपासून हा व्यवसाय करत असल्याने आजही तो आम्ही स्वखुशीने करतो़
-शेख अतिख (विक्रेते, कंधार)