मेसचे बिल मंजूर करण्यासाठी लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 05:49 PM2017-11-21T17:49:21+5:302017-11-21T18:53:33+5:30
मेसचे बिल मंजूर करण्यासाठी गृहपाल किशोरी अलोने यांना २० हजाराची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
नांदेड : मेसचे बिल मंजूर करण्यासाठी गृहपाल किशोरी अलोने यांना २० हजाराची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हदगाव येथील समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वसतिगृहात त्या कार्यरत असून याच ठिकाणी त्यांना पकडण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, हदगाव येथे समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. येथे ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनी राहत असून किशोरी अलोने या गृहपाल आहेत. वसतिगृहात कार्यरत असलेल्या खानावळीचे बिल काढताना विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरावी भरावी लागते. हि बाब लक्षात घेऊन अलोने यांनी मेस चालकाची अडवणूक करत विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरण्यासाठी २० हजार रुपयाची मागणी केली. यानंतर मेस चालकाने याबाबत नांदेड एसीबी कडे तक्रार केली.
तक्रारीची शहानिशा करत आज सकाळी ११ वाजता नांदेड एसीबी ने शासकीय वसतिगृह परिसरात सापळा रचला. यावेळी अलोने या मेस चालकाकडून २० हजाराची लाच स्वीकारताना एसिबी च्या जाळ्यात अडकल्या. विशेष म्हणजे, अलोने यांच्यावर यापूर्वीच लाच घेतल्याच्या प्रकरणात गोंदिया येथे उद्या तारीख होती.
याप्रकरणात हदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. हा सापळा पोलीस अधीक्षक संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक संजय कुलकर्णी, निरीक्षक कपिल शेळके, दयानंद सरवदे, हेड कॉन्स्टेबल नामदेव सोनकांबळे, शेख चांद, आशा गायकवाड, शेख मुजीब यांनी यशस्वी केला.