लस घ्या, मृत्यूचा धोका होतो कमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:17 AM2021-04-24T04:17:56+5:302021-04-24T04:17:56+5:30
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी या लसी सक्षम असल्याचा अनुभव आता अनेकांना येत आहे. सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्हीपैकी एक ...
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी या लसी सक्षम असल्याचा अनुभव आता अनेकांना येत आहे. सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्हीपैकी एक लस नागरिकांना देण्यात येत आहे. जास्तीतजास्त नागरिकांनी लसीकरण करावे, असे आवाहन शासनाबरोबरच आता प्रशासनाकडूनही करण्यात येत आहे. मात्र अद्यापही काही जण ही लस घेण्याबाबत साशंक असल्याचे दिसते. मात्र वेळीच कोरोनावरील लस न घेतल्यास याचे मोठे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.
यासाठी प्रत्येकाने घ्यावी लस..........
कोरोनामुळे शंभर लोकांमध्ये दोन ते चार जणांचा मृत्यू होत आहे. लसीकरणामुळे काही दुष्परिणाम झाला तरी तो लाखात एक असेल. त्यातही तो प्राणघातक असणार नाही. त्यामुळे लसीकरण केंव्हाही चांगले. कारण सर्व लसीमध्ये मृत्यूपासून बचाव करण्याची क्षमता आहे. विशेषत: गंभीर कोविडच्या विरुद्ध अत्यंत उच्च कार्यक्षमता व रोग प्रतिकारक क्षमता आहे.
लस घेतल्यानंतर घाबरू नका......
लस घेतल्यानंतर काहींना अंगदुखी, ताप, डोकेदुखी, मळमळ, उलटी, अशक्तपणा हे सर्वसामान्य दुष्परिणाम सामान्यपणे दिसतात. मात्र ते केवळ एक ते दोन दिवस राहतात. पॅरासिटामोल, क्रोसिन या औषधाने बरे होतात. काहींना तर काहीच लक्षणे दिसत नाहीत. वरीलपैकी काहीही त्रास झाल्यास घाबरण्याचे कारण नाही. हे शरीराची प्रतिकारशक्ती कार्यान्वित झाल्याचे लक्षण आहे.
दोन्ही डोसनंतर मोजकेच पॉझिटिव्ह.........
जिल्ह्यात साधारण पावणेतीन लाखांहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे. त्यातील अनेकांनी लसीचा दुसरा डोसही घेतला आहे. यातील साधारण २ टक्के नागरिकांना कोराेनाची त्यानंतरही बाधा झाल्याचे आढळले. मात्र लक्षणे अगदी सामान्य आढळल्याने हे नागरिक घरच्या घरीच उपचाराने बरे झाले.
आतापर्यंत लस घेतलेले - २,७४,२७३
पहिला डोस - २,५२,२६४
दुसरा डोस - २२,००९