नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर घागरमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:12 AM2018-02-21T00:12:14+5:302018-02-21T00:13:09+5:30
उन्हाळ्याची चाहूल लागली असून किनवट तालुक्यात आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत़ तालुक्यातील मौजे धानोरा येथील पाणीसाठे कोरडेठाक पडल्यामुळे पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे़ त्यात उपविभागीय अधिका-यांनी टँकर सुरु करण्याला मंजुरी देवूनही टँकर सुरु करण्यात आले नाही़ या विरोधात धानोरा येथील महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर घागरमोर्चा काढला़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : उन्हाळ्याची चाहूल लागली असून किनवट तालुक्यात आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत़ तालुक्यातील मौजे धानोरा येथील पाणीसाठे कोरडेठाक पडल्यामुळे पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे़ त्यात उपविभागीय अधिका-यांनी टँकर सुरु करण्याला मंजुरी देवूनही टँकर सुरु करण्यात आले नाही़ या विरोधात धानोरा येथील महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर घागरमोर्चा काढला़
किनवट तालुक्यातील मौजे धानोरा येथे दोन विहिरी आणि दोन हातपंप आहेत़ परंतु ते कोरडेठाक पडले आहेत़ पाण्याची गावात पर्यायी व्यवस्थाच नसल्यामुळे गावात टँकर सुरु करण्यात यावे, असा ठराव ग्रामपंचायतीने घेतला़
तहसीलदारांनी २ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकाºयांकडे हा प्रस्ताव पाठविला़ उपविभागीय अधिकाºयांनी ६ फेब्रुवारी रोजी तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला, परंतु त्यानंतरही या गावात टँकर सुरु करण्यात आले नाही़ त्यामुळे पाण्यासाठी धानोरा येथील महिलांनी नांदेड गाठले़ डोक्यावर घागरी घेवून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलन सुरु केले़ त्यानंतर या संतप्त ग्रामस्थांनी आपला मोर्चा जिल्हा परिषदेकडे वळवला. जिल्हा परिषदेत कार्यालयात जाणारा रस्ता त्यांनी रोखून धरला. संतप्त महिलांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली़ आंदोलनात सरपंच निलेश कुमरे, रत्नमाला कुमरे, महादेवी मठपती, अश्विनी सोनुले, राधाबाई शिंदे, कल्पना तोडसाम, तानूबाई आत्राम, अर्चना कुमरे, गिता कुमरे, सोनू कुडमते, सोमित्राबाई कुठमते, ज्योत्स्ना आत्राम, संध्या नप्ते, सुलोचना कुमरे आदींचा समावेश होता़