‘गिरीराज’कडून पिशव्यांचे काम काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 01:22 AM2019-01-17T01:22:27+5:302019-01-17T01:22:47+5:30
पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर कापडी पिशव्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेमार्फत मोफत वाटप करावयाच्या कापडी पिशव्यांचे काम अखेर ‘गिरीराज’ कडून काढून घेण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले.
नांदेड : पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर कापडी पिशव्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेमार्फत मोफत वाटप करावयाच्या कापडी पिशव्यांचे काम अखेर ‘गिरीराज’ कडून काढून घेण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले.
प्लास्टिकबंदी निर्णयानंतर कापडी पिशव्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी नांदेड महापालिकेला जिल्हा नियोजन समितीमार्फत सव्वा कोटी रुपये देण्याचा निर्णय पालकमंत्री रामदास कदम यांनी घेतला. या निर्णयानुसार हे काम बचत गटांना दिले जाईल, असे खुद्द कदम यांनी जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात हे काम ठेकेदारांच्या घशात घालण्यात आले. सप्टेंबर २०१८ मध्ये ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. पिशव्यासाठी कपड्याचा पुरवठा करण्याचे काम गिरीराज सेल्स कार्पोरेशनला तर कापडी पिशव्या शिवून देण्याचे काम गिरीराज फाऊंडेशनला दिले होते. ४५ बाय ३०, ३० बाय ३० आणि ४५ बाय ४५ या आकाराच्या पाच लाख पिशव्या शिवण्याचे काम सदर ठेकेदारास दिले होते. मात्र, हे काम करण्याची आर्थिक क्षमता सदर ठेकेदाराकडे नसल्याने हा निधी महापालिकेने तात्काळ महिला आर्थिक विकास महामंडळाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निधी प्राप्त झाल्यानंतर ‘माविम’ ने एका महिन्याच्या आत कापडी पिशव्या तयार करुन शहरात वाटप कराव्यात, असे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले.