सत्ता भाजपाकडे द्या, निधी कमी पडणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:24 AM2018-12-08T00:24:42+5:302018-12-08T00:25:23+5:30
लोहा शहरात अनेक पक्षांनी सत्ता उपभोगली. परंतु, शहराचा विकास करण्यात ते अपयशी ठरले.
लोहा : लोहा शहरात अनेक पक्षांनी सत्ता उपभोगली. परंतु, शहराचा विकास करण्यात ते अपयशी ठरले. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपाच्या हाती सत्ता सोपवा. सत्ता दिल्यास लोहा शहराला निधी कमी पडणार नाही, असा शब्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे पाटील यांनी दिला.
लोहा नगरपालिका निवडणूक भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी खा.दानवे यांनी भाजपा पक्षाची वाढ, केंद्र व राज्य सरकारने मागील चार वर्षात राबविलेल्या विविध योजना, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांना विविध योजनांच्या माध्यमातून दिलेला दिलासा याबाबत ऊहापोह केला. एकेकाळी भाजपाच्या बैठकीला सरपंच येत नव्हते. तेथे आज भाजपाचे ५ हजारावर सरपंच असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी मतदारांनी पूर्वी केलेले मतदान हे पंतप्रधान, मुख्यमंत्री निवडण्यासाठी केले. आताचे मतदान हे आपल्या शहराच्या विकासासाठी करायचे आहे. असे सांगत, यापूर्वी सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांना शहरातील मूलभूत सुविधा पुरविण्यात यश आले नाही, असा आरोप केला. आ.चिखलीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या उमेदवारांना विजयी करुन पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कमळाकडे द्या. विकासासाठी निधी कमी पडणार नाही. भाजपा सरकारने या भागात तीन महामार्ग आणले आहेत. चौथा महामार्ग जाहीर केला आहे. आमचे सरकार आल्यापासून शेतकरी कर्जमाफी सारखा मोठा निर्णय घेतला. आता कुटुंब घटकापेक्षा व्यक्ती हा घटक करत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.
यावेळी माजी खा. भास्करराव पा. खतगावकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. राम पा.रातोळीकर, आ.विनायकराव पाटील, भाऊराव देशमुख, लातूर भाजपा जि.अध्यक्ष नागनाथ निडवदे, नांदेड महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, प्रवीण साले, देवीदासराव राठोड, अॅड. सुरेंद्र घोडजकर, सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे, दिलीप कंदकुर्ते, श्रावण पा.भिलवंडे, माधव साठे, लक्ष्मण ठक्करवाड, नागनाथ घिसेवाड, मिलिंद देशमुख, गणेश पा.सावळे, जि.प.सदस्य प्रवीण पा.चिखलीकर, प्रणिती देवरे-चिखलीकर माधवराव देवसरकर, आदींची उपस्थिती होती.
माझा पायगुणच चांगला
भाजपा पक्षवाढीचा आता वेग वाढला आहे. राज्यात मी जिथे प्रचाराला जातो. तेथील पालिका, म.न.पा.निवडणुकीत भाजपा विजयी झाली, असा दावा खा़ दानवे यांनी केला़