संधी मिळताच अनेकांनी घेतला दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:21 AM2021-08-23T04:21:22+5:302021-08-23T04:21:22+5:30
जिल्ह्यात कोराेनाची दुसरी लाट आता ओसरत चालली आहे. दररोज साधारणपणे दहापेक्षाही कमी रुग्ण आढळून येत आहेत. रुग्ण बरे होण्याचे ...
जिल्ह्यात कोराेनाची दुसरी लाट आता ओसरत चालली आहे. दररोज साधारणपणे दहापेक्षाही कमी रुग्ण आढळून येत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास ९७ टक्के आहे, तर मृत्यूदरही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे शासनाने सर्वच व्यवहार करण्यास मंजुरी दिली आहे. पूर्वीप्रमाणे सोहळेही सुरू झाले आहेत. असे असताना तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर लसीकरण आणि तपासण्यांचा वेग वाढविण्याचे शासनाचे आदेश आहेत. दररोज साधारणत: दोन हजार तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्यक्षात त्यातील अर्ध्याच तपासण्या होत आहेत. लसीकरणासाठीही प्रत्येक केंद्रावर फक्त शंभर डोस उपलब्ध होत आहेत. त्यामुळे काही जणांना माघारी जावे लागत आहे. असे असताना शासनाने पहिला डोस घेतल्यानंतर सुमारे १२ ते १६ आठवडे म्हणजेच ८४ दिवसांनंतर दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन केले आहे. परंतु अनेकजण पहिला डोस घेतल्यानंतर ३० दिवस लोटताच दुसरा डोस घेत आहेत. त्यामुळे पहिला डोस न मिळालेले अजूनही प्रतीक्षेतच आहेत.
चौकट- आतापर्यंत ९ लाख ३५ हजार जणांचे लसीकरण
जिल्ह्यात आतापर्यंत ९ लाख ३५ हजार ४९८ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. कोविशिल्डचे ७ लाख ५० हजार ३०, तर कोव्हॅक्सिनचे २ लाख ४४ हजार याप्रमाणे ९ लाख ९४ हजार ३० डोस प्राप्त झाले होते.