महिलांचा गौरव ही समाधानाची बाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:56 AM2019-02-10T00:56:18+5:302019-02-10T00:56:35+5:30
ग्रामीण भागातील महिला अतिशय खडतर परिस्थितीला सामोरे जात आपल्या कुटंबाला सावरत समाजात आपल्या मुलांना असामान्य पदावर पोहोचवण्याचे काम करतात.
गडगा : ग्रामीण भागातील महिला अतिशय खडतर परिस्थितीला सामोरे जात आपल्या कुटंबाला सावरत समाजात आपल्या मुलांना असामान्य पदावर पोहोचवण्याचे काम करतात. अनेक हालअपेष्टा सोसतात. कठीण परिस्थितीत अतिशय चिवट झुंज देऊन असामान्य कर्तृत्व गाजवतात. मात्र तुलनेने त्यांचा सन्मान होत नाही. परंतु अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरव केला. यानिमित्ताने महिलांचा सन्मान झाला, ही बाब गौरवास्पद आहे, असे मत महिला व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
न्यू जयभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या राजमाता अहिल्यादेवी महोत्सव पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंदराव केंद्रे हे होते.मंचावर प्रदेश प्रवक्ते गणेशराव हाके, खा. प्रीतम मुंडे, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, डॉ. माधवराव किन्हाळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. राम पाटील रातोळीकर, आ. तुषार राठोड, महानगराध्यक्ष संतुकराव हंबर्डे, प्रवीण साले, चैतन्य बापू देशमुख, माणिक लोहगावे, प्रवीण पा. चिखलीकर, माजी आमदार गंगाराम ठक्करवाड, श्रावण पाटील भिलवंडे, दिलीप धर्माधिकारी उपस्थित होते.
मुंडे पुढे म्हणाल्या, मराठा समाजाच्या आरक्षणासारखाच धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हाताळू. धनगर समाजाच्या ताकदीमुळेच आम्ही राज्य करीत आहोत. तुम्हाला दिलेला शब्द पाळणे हे माझे दायित्व समजते. कुठल्याही परिस्थितीत केंद्र सरकारला सकारात्मक अहवाल पाठवूच असे आश्वासन देत नरसीचा रखडलेला पाणीपुरवठ्याचा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगत लोकांना पाणी पाजविणाऱ्याच्या पाठीशी उभे रहा असे म्हणतानाच राजेशभाऊ तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी राहीन असे सांगण्यास त्या विसरल्या नाहीत. ज्यांना- ज्यांना आम्ही उमेदवारी देऊ अशा उमेदवारांच्या पाठीशी राहून पुन्हा केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आणा असे सांगत जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपाच्या पाठीशी राहा, असेही त्या म्हणाल्या. गुरूप्रीतकौर सोडी, दिलीप सिंग सोडी, राजश्री पाटील, धनश्री देव, देवीदास राठोड, मारोती वाडेकर, संजय पवार, शंकरराव काळे, रामेश्वर गंदपवार, जयराम कदम, धनराज शिरोळे,शंकर कल्याण, सचिन पाटील बेंद्रीकर आदी उपस्थित होते.