गोदा शुद्धीकरण; एसटीपीसाठी २० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:19 AM2019-06-19T00:19:37+5:302019-06-19T00:21:09+5:30

शहरातील नाल्यांचे पाणी गोदावरी नदीत मिसळू नये यासाठी महापालिका आता प्रयत्न करीत असून यासाठी शासनदरबारी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून २० कोटी रुपये लवकरच प्राप्त होणार आहेत.

godavari rejuvenation; 20 crore for STP | गोदा शुद्धीकरण; एसटीपीसाठी २० कोटी

गोदा शुद्धीकरण; एसटीपीसाठी २० कोटी

Next
ठळक मुद्देराज्य शासनाने दिली मनपाच्या प्रस्तावाला मान्यता

नांदेड : शहरातील नाल्यांचे पाणी गोदावरी नदीत मिसळू नये यासाठी महापालिका आता प्रयत्न करीत असून यासाठी शासनदरबारी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून २० कोटी रुपये लवकरच प्राप्त होणार आहेत. जवळपास ४० कोटी रुपयांचा हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
दक्षिण भारतातील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीला धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून गोदावरी नदीचे पावित्र्य लोप पावल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून गोदावरी शुद्धीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत.
महापालिकेने गोदावरी शुद्धीकरणासाठी चुनालनाला आणि शनिमंदिर परिसरात मलशुद्धीकरण केंद्र निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात अनेक अडथळे येत होते. हे अडथळे आता दूर झाले आहेत. प्रारंभी सुधारित आराखडा पाठविण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने सुधारित प्रस्ताव पाठवला. हा प्रस्ताव जवळपास ४० कोटींचा होता. चुनालनाला व शनिमंदिर परिसर येथे मलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव होता. या ठिकाणी शहरातून वाहणाºया नाल्यांचे पाणी गोदावरीत न मिसळता या पाण्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पालकमंत्री रामदास कदम यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पर्यावरण विभागामार्फत हा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. ४० कोटींच्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून २० कोटी रुपये तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महापालिकेने या कामाला सुरुवात केल्यानंतर गोदावरी शुद्धीकरणाचा विषय मार्गी लागणार आहे.
दरम्यान, गोदावरी नदीत मिळसणारे १९ नाले जलवाहिनीद्वारे देगलूर नाका येथील पंपगृहापर्यंत आणण्यात आले होते. तेथून ते पाणी बोंढार येथील मलशुद्धीकरण केंद्रात सोडण्यात आले. २००८ ते २०१७ पर्यंत ही योजना बंद पडली होती. तब्बल १३ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. बंद पडलेल्या या योजनेवर ५५ लाख रुपये खर्च करत महापालिकेने देगलूर नाका येथे पंपगृह सुरू केला. या योजनेअंतर्गत चुनाल नाला ते जुन्या पुलापर्यंत ६०० ते १००० एमएम व्यासाची जलवाहिनी टाकून शहरातील नाल्याचे पाणी देगलूरनाका येथील पंपगृहापर्यंत नेण्यात आले. काही दिवस ही योजना सुरळीत चाललीही. मात्र पुन्हा ‘जैसे थे’ पाढे सुरू झाले.
आजघडीला गोदावरी दुष्काळामुळे पूर्णत: कोरडी पडली आहे. काही दिवसांपूर्वी जलपर्णीचे मोठे संकट आले होते. हे संकट कायम असले तरीही पाण्याअभावी गोदावरी कोरडी पडली आहे. मनपा प्रशासनाने गोदावरी शुद्धीकरणासाठी तसेच जलपर्णी काढण्यासाठी सामाजिक संघटनांची मदत घेतली होती. तसेच पर्यावरणतज्ज्ञांची मतेही जाणून घेतली होती. त्यावर कामही सुरू झाले आहे. त्यात चुनालनाला व शनिमंदिर परिसरात मलशुद्धीकरण केंद्र उभारण्याची सूचना करण्यात आली होती.
एमआयडीसी, रेल्वे विभागाला पाणी
चुनालनाला आणि शनीमंदिर परिसरात होणा-या मलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी एमआयडीसी आणि रेल्वे विभागाला देण्याबाबत विचार सुरू आहे. परिणामी विष्णूपुरी प्रकल्पातून या दोन्ही विभागांना दिल्या जाणा-या पाण्याची बचत होणार आहे.
या दोन मलशुद्धीकरण केंद्राच्या निर्मितीमुळे शहरातून वाहणारे मुख्य नाल्यांचे पाणी आता नदीमध्ये मिसळणार नाही. देगलूरनाका येथेही एक मलशुद्धीकरण केंद्र आहे. या तीन केंद्रामुळे गोदावरीत नाल्यांचे जाणारे पाणी निश्चितपणे थांबेल, असा विश्वास आयुक्त लहुराज माळी यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: godavari rejuvenation; 20 crore for STP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.