गोदावरीची प्रदूषणमुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:16 AM2018-05-08T01:16:53+5:302018-05-08T01:16:53+5:30
शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीची झालेली अवस्था पाहता भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आल्यानंतर गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीची वाटचाल सुरू झाली आहे. तत्कालीन महापौर आणि आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल करुन कदम यांनी गोदावरी नदीप्रति आपली भावना स्पष्ट केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीची झालेली अवस्था पाहता भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आल्यानंतर गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीची वाटचाल सुरू झाली आहे. तत्कालीन महापौर आणि आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल करुन कदम यांनी गोदावरी नदीप्रति आपली भावना स्पष्ट केली होती.
दक्षिण भारतातील काशी समजल्या जाणाºया नांदेडला गोदावरी नदीमुळे हे महत्त्व प्राप्त झाले आहे. भावनिकदृष्ट्या आजही गोदामातेचे स्थान भाविकांच्या मनात कायमच आहे; पण गोदावरी नदीची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली होती. शहरातील १८ नाले थेट गोदापात्रात मिसळत होते. परिणामी गोदामातेचे पावित्र्य पूर्णत: लोप पावले होते.
देशभरातून नांदेडला येणारे शीख भाविक आणि दक्षिण भारतातील काशी म्हणून ओळखले जाणारे नांदेड शहर व या ओळखीतून येणारे देशभरातील भाविक गोदावरीची अवस्था पाहून तीव्र संताप व्यक्त करीत होते. सामाजिक संस्थाही गोदावरीच्या या नदीकडे दुर्लक्षच करीत होते. केवळ ्रकागदोपत्री तक्रारी, निवेदने दिले जात होते. अशातच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. या दौºयात त्यांनी गोदावरी काठाची पाहणी केली. ९ जून २०१७ रोजी केलेल्या या दौºयात गोदावरीची अवस्था पाहून पर्यावरणमंत्री कदम यांनी तत्कालीन अधिकाºयांना चांगलेच खडसावले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांना गोदावरी नदीच्या पाण्याचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तत्कालीन महापौर आणि आयुक्तांविरुद्ध गुन्हेही दाखल केले होते. त्या कारवाईनंतर महापालिका खडबडून जागी झाली. महापालिकेने गोदावरी शुद्धीकरणाच्या हालचालींना प्रारंभ केला.
त्यातच पालकमंत्रीपदाचा पदभारही पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडेच आला. त्यांनी गोदावरी नदीच्या शुद्धीकरणास प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले होते.
महापालिकेने गोदावरी शुद्धीकरणाची मोहीम उघडताना प्रारंभी गोदावरी नदीत थेट मिसळणारे शहरातील १७ नाले बंद केले. गोदावरी काठावरुनच चार किलोमीटर अंतराची स्वतंत्र ड्रेनेजलाईन टाकली. चुनाल नाला उर्वशी घाट ते जुना पुलापर्यंत ६०० एम.एम. ते १ हजार एम.एम. व्यासाची पाईपलाईन टाकून गोदावरी नदीत मिसळणारे १७ नाले या पाईपलाईनला जोडले. परिणामी आज घडीला गोदावरी नदीत मिसळणारे १७ नाले पूर्णत: बंद झाले आहेत. त्यामुळे पाणी गोदावरीत जाणे थांबले आहे.
गोवर्धनघाट, बंदाघाट, नगिनाघाट, गायत्री मंदिर, शनि मंदिर, बालाजी नाला, गाडीपुरा नाला, बडी दर्गाह नाला, नावघाट नाल्यातून वाहणारे पाणी आता थेट देगलूर नाका पंपींग स्टेशनपर्यंत पोहोचविले जात आहे. हे पाणी पंपींग स्टेशनहून बोंढार जलशुद्धीकरण प्रकल्पात पाठविले जाते.
एकूणच गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी आता महापालिकेने आता कायमस्वरूपी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीचा प्रकल्प तयार करण्यात आला होता. जवळपास २२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या मान्यतेनंतर गोदावरी नदी निश्चितच प्रदूषणमुक्त होईल, असे पाणीपुरवठा व मलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे म्हणाले.
गोदावरी शुद्धीकरणासाठी २२ कोटींचा प्रस्ताव
गोदावरी शुद्धीकरणाचे हे प्रयत्न सुरू ठेवतानाच महापालिकेने नव्याने २२ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. या नव्या प्रकल्पात शहरातील उर्वशी घाटावर ६ एमएलडी क्षमतेचे नवीन जल शुद्धीकरण केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच बडी दर्गाह ते देगलूरनाका दरम्यान मोठा उघडा नाला प्रस्तावित आहे.
या नाल्याचे अंतर २ कि.मी. राहणार आहे. पावसाळ्यातील पाण्याचे प्रमाण जास्त असते. परिणामी हे पाणी पाईपलाईनमधून पूर्णपणे वाहणे शक्य नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीसाठी हा २ कि.मी.चा उघडा नाला प्रस्तावित केल्याचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सांगितले.
सामाजिक संस्थांच्या पुढाकाराची गरज
गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने प्रशासकीय स्तरावर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्या योजनांचा आता परिणामही पुढे येत आहे. गोदावरी नदीत मिसळणारे थेट नाले बंद झाले आहेत. त्यामुळे आता गोवर्धनघाटापासून गायत्री मंदिर बालाजी नालापर्यंतचा घाट निश्चितच मोकळा झाला आहे. त्याच्यापुढे नावघाटपर्यंतच्या भागातून गोदावरीत मिसळणारे नाले थांबविण्यात आले आहेत. महापालिकेकडून सध्या स्वच्छता मोहीम राबविली जात असली तरी ती कायमस्वरुपी असणार नाही. या घाटावर आता सामाजिक संस्थांनी स्वच्छता मोहीम राबविल्यास हा परिसर सुंदर होईल तसेच वापरातही येणार आहे.
सामाजिक संस्थांच्या पुढाकाराची गरज
गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने प्रशासकीय स्तरावर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्या योजनांचा आता परिणामही पुढे येत आहे. गोदावरी नदीत मिसळणारे थेट नाले बंद झाले आहेत. त्यामुळे आता गोवर्धनघाटापासून गायत्री मंदिर बालाजी नालापर्यंतचा घाट निश्चितच मोकळा झाला आहे. त्याच्यापुढे नावघाटपर्यंतच्या भागातून गोदावरीत मिसळणारे नाले थांबविण्यात आले आहेत. महापालिकेकडून सध्या स्वच्छता मोहीम राबविली जात असली तरी ती कायमस्वरुपी असणार नाही. या घाटावर आता सामाजिक संस्थांनी स्वच्छता मोहीम राबविल्यास हा परिसर सुंदर होईल तसेच वापरातही येणार आहे.