घराबाहेर जाताय... कुलूपबंद घर सांभाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:19 AM2021-09-27T04:19:52+5:302021-09-27T04:19:52+5:30
घरास कुलूप लावून बाहेर जाताना आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याने चाेरट्यांचे फावत आहे. काेराेनानंतर नागरिक आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी ...
घरास कुलूप लावून बाहेर जाताना आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याने चाेरट्यांचे फावत आहे. काेराेनानंतर नागरिक आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. याच बाबीमुळे चाेरीचे प्रकारही वाढले आहेत. बाहेरगावी जाताना घरात एखादा व्यक्ती असणे आवश्यक आहे. जर शक्य नसेल तर शेजाऱ्यांना अथवा संबंधित ठाण्यास माहिती देणे आवश्यक असते. मात्र, तसे केले जात नाही. परिणामी, घरातील किमती ऐवज चाेरटे लंपास करतात. चाेरीचा तपास करणेही पाेलिसांपुढे आव्हानच असते.
नांदेड परिक्षेत्रात ३१८ गुन्हे दाखल
नांदेड पाेलीस परिक्षेत्रात घरफाेडीच्या ३१८ घटना घडल्या आहेत. त्यातील ५२ घटनांचा तपास पूर्ण झाला आहे. सर्वाधिक १२२ घरफाेडीच्या घटना नांदेड जिल्ह्यात झाल्या असून १९ घरफाेडींचा तपास लावता आला आहे.
परभणी जिल्ह्यात ८० पैकी १३, हिंगाेली जिल्ह्यात ३९ पैकी ७ आणि लातूर जिल्ह्यात ७७ पैकी १३ घरफाेडींचा तपास पाेलिसांनी लावला आहे. चाेरीच्या घटनाही माेठ्या प्रमाणात झाल्या आहेत. ६०३ घटना नांदेड जिल्ह्यात जूनअखेरपर्यंत घडल्या असून १४२ घटनांचा तपास लावण्यात पाेलीस यशस्वी ठरले आहेत.
१०० घटनांचा अजूनही ‘तपास सुरू’!
जिल्ह्यात झालेल्या घरफाेडींचा तपास पाेलीस करत असले तरीही यातील १०० हून अधिक घटनांचा तपास पाेलिसांच्या लेखी सुरूच आहे. तक्रारीनंतर घरमालक ठाण्यात फेऱ्या मारतात. आपल्या चाेरीचा तपास सुरूच असल्याचे उत्तर त्यांना दिले जाते.
अनलाॅकनंतर चाेऱ्या वाढल्या
काेराेनाचे संकट हळूहळू कमी हाेत असल्याने नागरिक घराबाहेर पडत आहेत. काेराेना संकटात जवळपास बंदच झालेल्या घरफाेड्यांचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. या चाेऱ्यांना काही प्रमाणात नागरिकांचा बेजबाबदारपणाही कारणीभूत ठरताे.