हळद उत्पादकांना अच्छे दिन; भाव साडेआठरा हजार पार
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: April 25, 2024 19:02 IST2024-04-25T19:02:12+5:302024-04-25T19:02:25+5:30
हळद काढणीला सुरुवात झालेली असून, यावर्षी पाडव्याच्या मुहूर्तापूर्वीच हळद विक्रीसाठी बाजारात आणली आहे.

हळद उत्पादकांना अच्छे दिन; भाव साडेआठरा हजार पार
नांदेड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये नव्या हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, दरदिवशी दोन हजारांवर कट्टे हळद विक्रीसाठी येत आहेत. सदर हळदीला नांदेडमध्ये या वर्षातील सर्वोच्च १८ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने हळद उत्पादकांना आले आहेत.
हळद काढणीला सुरुवात झालेली असून, यावर्षी पाडव्याच्या मुहूर्तापूर्वीच हळद विक्रीसाठी बाजारात आणली आहे. अनेक शेतकऱ्यांनी लवकर लागवड केल्यामुळे काढणी लवकर होऊन थेट विक्रीसाठी मोंढ्यात आणली. तर बहुतांश भागात हळदीची काढणी सुरू आहे. आतापर्यंत आलेल्या हळदीचा उतारा समाधानकारक असल्याचे शेतकरी सांगताहेत, पण काही शेतकऱ्यांच्या हळदीवर करपा आल्याने अशा शेतकऱ्यांना उत्पादनात फटका बसला आहे. सोमवारी झालेल्या लिलाव बाजारात हळदीला जास्तीत जास्त १८ हजार ७०० रुपये तर किमान १५ हजार तर सरासरी १६९०० रुपयांचा प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हळदीचे दर कमी अधिक प्रमाणात होत असले तरी यंदा हळदीचे उत्पादन घटल्याने येत्या काही दिवसांत भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पंधरा दिवसांपासून दरात वाढ
मार्च महिन्यात नांदेड मार्केट यार्डात हळदीचे भाव १५ हजार रुपयांपर्यंत होते. पण, त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून हळदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सध्या हळदीला सरासरी १७ हजारांपर्यंत भाव मिळत आहे.
सोयाबीनच्या दरात मोठी घसरण
एकीकडे दिवसेंदिवस हळदीचे भाव वाढत असले तरी सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे. पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असलेले सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटलला ४२०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. सोयाबीनला जास्तीत जास्त ४४८५ तर कमीत कमी ४२०० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.
तुरीने घेतली उच्चांकी
तुरीचे भाव नऊ हजारांपर्यंत खाली आले होते. पण, मागील काही दिवसांत तुरीला सर्वोच्च १०५०० रुपये प्रतिक्विटंल भाव मिळाला आहे. तुरीला सरासरी ९८५० रुपये भाव मिळत आहे.