खुशखबर ! राजस्थामध्ये अडकलेल्या १ हजार ७६४ विद्यार्थ्यांना आणण्यासाठी आज रात्री धुळ्याहून ७२ बस निघणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 03:40 PM2020-04-29T15:40:24+5:302020-04-29T15:47:37+5:30
राज्यात परत आणावे यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी राज्यशासनाकडे विविध माध्यमातून मागणी केली जात होती.
- अनुराग पोवळे
नांदेड : राजस्थान कोटा इथे अडकलेल्या राज्यातील १ हजार ७६४ विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी धुळे येथून राज्य परिवहन विभागाच्या ७२ बस आज बुधवारी रात्री निघणार आहेत. यामुळे लॉकडाऊनमध्ये कोटा येेेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राजस्थानातील कोटा येथे आय आय टी, जे ई ई आदी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी देशभरातून विद्यार्थी जात असतात. महाराष्ट्रतूनही जवळपास दोन हजार विद्यार्थी राजस्थानात लॉकडावूनमध्ये अडकले आहेत. राज्यात परत आणावे यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी राज्यशासनाकडे विविध माध्यमातून मागणी केली जात होती.
नांदेड जिल्ह्यातीलही जवळपास २०० विद्यार्थी राजस्थानमध्ये अडकले होते. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. या विषयात राज्यातील अन्य नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांकडे चर्चा केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी चर्चा करत विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला. मंत्रालयातही विशेष अधिकाऱयांची नियुक्ती करून माहिती एकत्रीत केली. अखेर या प्रकरणात विद्यार्थ्यांना परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील १ हजार ७६४ विद्यार्थ्यांना स्वगृही आणण्यासाठी ७२ बस आज बुधवारी रात्री ११ वाजता धुळे येथून निघणार आहेत. जवळपास १५ तासांच्या प्रवासानंतर या ७२ बस कोटा येथे पोहोचणार आहेत.
या बसच्या ताफ्यासोबत विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी नरेंद्र चित्ते आणि विभागीय वाहतूक अधीक्षक पंकज देवरे हे राहणार आहेत. संपर्कासाठी ९०२१३३६२३४ आणि ७५८८५२०४३६ हे क्रमांकही उपलब्ध करून दिले आहेत.