रामभक्तांसाठी खुशखबर! अयोध्यासाठी धावणार मराठवाड्यातून तीन विशेष 'आस्था' रेल्वे
By प्रसाद आर्वीकर | Published: January 20, 2024 04:32 PM2024-01-20T16:32:49+5:302024-01-20T16:37:14+5:30
मराठवाड्यातील भाविकांना अयोध्या येथे जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता यावे, या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वे विभागाचा निर्णय
नांदेड : अयोध्यायेथे श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर मराठवाड्यातून भाविकांना अयोध्येला जाण्यासाठी तीन रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे विभागाने घेतला आहे.
२२ जानेवारी रोजी आयोध्या येथे श्री रामलल्ला मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी उत्सव साजरा केला जात आहे. मराठवाड्यातील भाविकांना अयोध्या येथे जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता यावे, या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वे विभागाने विविध ठिकाणाहून आस्था रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठवाड्यातून तीन रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे. १४ फेब्रुवारी नांदेड येथून नांदेड- आयोध्या (०७६३६) ही विशेष रेल्वे औरंगाबाद मार्गे धावणार आहे. नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजी नगर, अंकाई, मनमाड, भुसावळ मार्गे ही रेल्वे अयोध्या येथे पोहचेल. तसेच परतीच्या प्रवासात १६ फेब्रुवारी रोजी अयोध्या येथून निघणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी सिकंदराबाद - अयोध्या (०७२९७) ही रेल्वे नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खांडवा मार्गे अयोध्या येथे जाईल. २१ फेब्रुवारी रोजी या रेल्वेचा परतीचा प्रवास होईल.
त्याचप्रमाणे ४ फेब्रुवारी रोजी जालना - अयोध्या (०७६४९) ही रेल्वे परभणी, पूर्णा, नांदेड मार्गे धावणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी ही रेल्वे अयोध्या ते जालना (०७६४९) धावणार आहे. अयोध्यासाठी मराठवाड्यातून तीन रेल्वे गाड्या धावणार असल्याने राम भक्तांसाठी प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.