नेत्याला दक्षिणा दिली जमून जाईल असे चालणार नाही, जनतेच्या पैश्यातून चांगले काम झालेच पाहिजे
By शिवराज बिचेवार | Published: May 20, 2023 07:38 PM2023-05-20T19:38:11+5:302023-05-20T19:39:46+5:30
जनतेचा पैसा आहे, चांगले काम झाले पाहिजे; नितीन गडकरी यांचा कंत्राटदारांना इशारा
नांदेड- बिगारभरती काम कराल तर याद राखा, माल-पाणी घेणारे नेते आम्ही नाही, चांगले काम झाले नाही तर रगडल्याशिवाय राहणार नाही. अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंत्राटदारांना व्यासपीठावरुनच इशारा दिला. शनिवारी श्रीक्षेत्र माहूर येथे स्काय वॉक भूमिपुजन कार्यक्रमासाठी ते आले होते.
यावेळी गडकरी म्हणाले, जनतेचा पैसा आहे, चांगले काम झाले पाहिजे. नाही तर नेत्याला दक्षिणा दिली आता जमून जाईल पण असे होणार नाही. काम न करणाऱ्या दोन कंत्राटदारांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यात वारंगा रस्त्याच्या कामाच्या कंत्राटदाराचा समावेश आहे. त्या ठिकाणी नवीन कंत्राटदार नेमून त्याला १२ कोटी रुपये दिले आहेत. तसेच पुढच्या सहा महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे. मी आजपर्यंत देशात ५० लाख कोटी रुपयांची कामे केली आहेत. त्यात भारतमाला, पर्वतमाला, सागर माला अशा मोठमोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. नुकतेच शंभर किमीच्या रस्त्याचाही विक्रम करण्यात आला आहे. आज देश बदलत आहे. मोदींचे स्वप्न भारताला आत्मनिर्भर, सुखी समृद्ध करण्याचे आहे. माहूर गडावरील स्कॉयवॉकचे काम करण्यासाठी एवढा वेळ का लागतो हे समजत नाही. ५१ कोटीच्या कामासाठी १८ महिन्यांची मुदत ही खुप झाली. मी दोन वर्षात १ लाख कोटींचा दिल्ली-मुंबई रस्त्याचे काम केले. त्यामुळे पुढील वर्षभरात स्कॉयवॉकचे काम पूर्ण करा. मी तुम्हाला प्रशस्तीपत्र देवून सत्कार करेल. तसेच आणखी शंभर कामे तुम्हाला देईल असे आश्वासनही गडकरी यांनी दिले.
मागच्या जन्मी पाप करणारा साखर कारखाना काढतो
वाशिमचा साखर कारखाना सुरु करण्याबाबत मला काही आमदार आणि खासदार भेटले. परंतु मी नेहमी सांगतो, हेमंत पाटील तुम्ही लक्ष द्या. जो मागच्या जन्मी पाप करतो तो एक तर साखर कारखाना काढतो किंवा वर्तमानपत्र सुरु करतो. असे वक्तव्य गडकरी यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.