शासकीय आयुर्वेद महाविद्यालय झाले थकबाकीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:18 AM2021-03-25T04:18:03+5:302021-03-25T04:18:03+5:30

नांदेड : आर्थिक विवंचनेत सापडलेल्या महावितरणने मार्चअखेर थकबाकी वसुलीकरिता आता महानगरपालिका व नगरपालिकांकडे असलेल्या पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या थकबाकी ...

Government Ayurveda College became arrears free | शासकीय आयुर्वेद महाविद्यालय झाले थकबाकीमुक्त

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय झाले थकबाकीमुक्त

Next

नांदेड : आर्थिक विवंचनेत सापडलेल्या महावितरणने मार्चअखेर थकबाकी वसुलीकरिता आता महानगरपालिका व नगरपालिकांकडे असलेल्या पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या थकबाकी वसुलीबरोबरच शासकीय आस्थापनाकडे असलेल्या थकबाकी वसुलीच्या दृष्टीने पाठपुरावा सुरू केला आहे. सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर नांदेडच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाने चालू देयकासह २१ लाख ६० हजार रुपयांची थकबाकी भरून वीज बिल कोरे केले आहे.

नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांनी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. वाय. आर. पाटील यांच्याकडे वारंवार विचारणा करून थकीत बिल भरण्याबाबत आग्रह धरला होता. डॉ. पाटील यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत कार्यकारी अभियंता जे. एल. चव्हाण आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता भुसारी यांना आज २१ लाख ६० हजारांचा धनादेश सुपूर्द केला. या कामी सहायक अभियंता धैर्यशील देशमुख यांनी परिश्रम घेतले.

येणारा उन्हाळा सुसह्य होण्यासाठी ‘माझे बिल, माझी जबाबदारी’ या भावनेतून थकबाकी असलेल्या सर्व वीज ग्राहकांनी आपले वीज बिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करावे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही योग्य ती खबरदारी घेत महावितरणचे सर्व अधिकारी, कर्मचारी आपल्या दारावर येत असून, वीज बिल भरून त्यांना सहकार्य करावे. वीज ग्राहकांना अखंडित वीज सेवा देणे हीच आमची आग्रही भूमिका आहे. आपणही आपले कर्तव्य पार पाडत वीज बिल भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

जि. प. सदस्य पाटील यांनी केला दोन लाखांचा भरणा

महाकृषी ऊर्जा अभियानाच्या धोरणांचा कृषिपंप थकबाकीतील विलंब आकार व व्याजाच्या माफीतून मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेत माळाकोळी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन ईश्वरराव पाटील यांनी तब्बल २ लाख ९३८ रुपयांची सूट मिळवत २ लाख १८ हजार ८५० रुपयांचे कृषिपंपाच्या वीजजोडणीचे बिल भरून आपले बिल कोरे केले आहे. लोहा उपविभागांतर्गत येणाऱ्या गौंडगाव गावात चंद्रसेन ईश्वरराव पाटील यांच्याकडे पाच कृषिपंप वीज जोडण्या आहेत. या पाच वीज जोडण्यांची ४ लाख १९ हजार ७८८ रुपयांची थकबाकी होती. अभियानांतर्गत २ लाखांची भरघोस सूट मिळवत दोन लाख रुपयांचा वीज बिल भरणा केला. याप्रसंगी कार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण यांच्या हस्ते चंद्रसेन पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कंधार उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता महेश वाघमारे, उच्चस्तर लिपिक राजकुमार सिंदगीकर उपस्थित होते.

Web Title: Government Ayurveda College became arrears free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.