शासकीय गोदामातील ट्रक थेट अ‍ॅग्रो कंपनीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:24 AM2018-08-02T00:24:41+5:302018-08-02T00:25:26+5:30

पोलिसांनी धाड मारुन कृष्णूरच्या औद्योगिक वसाहतीतील मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीच्या गोदामावरुन गहू आणि तांदळाचे दहा ट्रक पकडले होते़ शासकीय गोदामातून धान्य घेऊन निघालेले ट्रक आणि कृष्णूरच्या मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीत पोहोचलेले ट्रक याच्या सर्व नोंदी दोन्ही ठिकाणच्या रजिस्टरमध्ये आहेत़ या दोन्ही नोंदी सारख्याच आहेत़ त्यामुळे पोलिसांनी या दोन्ही ठिकाणचे रजिस्टर जप्त केले असून त्यातून या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून येत आहे़

Government godown truck directly into Agro company | शासकीय गोदामातील ट्रक थेट अ‍ॅग्रो कंपनीत

शासकीय गोदामातील ट्रक थेट अ‍ॅग्रो कंपनीत

Next
ठळक मुद्देकाळा बाजार : दोन्ही रजिस्टरच्या नोंदी सारख्याच

शिवराज बिचेवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : पोलिसांनी धाड मारुन कृष्णूरच्या औद्योगिक वसाहतीतील मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीच्या गोदामावरुन गहू आणि तांदळाचे दहा ट्रक पकडले होते़ शासकीय गोदामातून धान्य घेऊन निघालेले ट्रक आणि कृष्णूरच्या मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीत पोहोचलेले ट्रक याच्या सर्व नोंदी दोन्ही ठिकाणच्या रजिस्टरमध्ये आहेत़ या दोन्ही नोंदी सारख्याच आहेत़ त्यामुळे पोलिसांनी या दोन्ही ठिकाणचे रजिस्टर जप्त केले असून त्यातून या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून येत आहे़
नांदेड जिल्ह्यात धान्याचा काळा बाजार करणारी मोठी लॉबी पोलिसांच्या तपासात उघडी पडण्याचे संकेत तपासातून मिळत आहेत़ पोलिसांनी धान्य वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांचा जीपीएस डाटा मिळविला आहे़ त्याचबरोबर मुसलमानवाडी येथील शासकीय धान्य गोदामातून धान्य घेवून निघालेले ट्रक ज्या-ज्या टोलनाक्यावरुन जातात़ त्या त्या टोलनाक्यावरील मागील सहा महिन्यांचे रेकॉर्डही पोलिसांनी जप्त केले आहे़ शासकीय गोदामातून धान्य घेवून निघालेला ट्रक टोलनाक्यावरुन ठरवून दिलेल्या तालुक्याच्याच मार्गावर आले होते की मध्येच त्यांनी मार्ग बदलला़ या सर्वांचा उलगडा सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीतून होणार आहे़ मागील सहा महिन्यांच्या काळातील हे रेकॉर्ड असल्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ त्याचबरोबर शासकीय गोदामातून धान्य घेवून निघालेल्या ट्रकची त्या ठिकाणच्या रजिस्टरमध्ये नोंद केली जाते़ त्यामध्ये ट्रकचा क्रमांक, चालकाचे नाव व इतर माहितीचा समावेश असतो़ अशाचप्रकारचे एक रजिस्टर कृष्णूरच्या मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीतही आढळून आले असून या दोन्ही रजिस्टरच्या नोंदी सारख्याच असल्याची माहिती तपासात पुढे आल्याचे सूत्रांकडून समजते़
दरम्यान, कृष्णूर येथील मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीतील व्यवस्थापकाच्या कॅबिनशेजारी असलेली एक खोली पोलिसांनी सील केली होती़ मंगळवारी ही खोली उघडल्यानंतर त्यामध्ये जवळपास टेम्पोभर कागदपत्रे आढळली़
---
परवानगी घेऊनच गोदामांची तपासणी
तहसीलदार संघटनेने पोलीस परवानगी न घेताच अन् वाट्टेल त्या ठिकाणी नेऊन चौकशी करीत असल्याचा आरोप केला होता़ त्याबाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन म्हणाले, या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरु आहे़ गोदाम तपासणीसाठी संबंधित तहसीलदार, गोदामपाल यांची परवानगी घेण्यात आली आहे़ महसूल प्रशासनानेही तपासात सहकार्य केले असून त्यांच्याकडूनच सर्व कागदपत्रे मिळाली़ या प्रकरणात पुरावे भक्कम असल्याचेही नुरुल हसन म्हणाले़
---
तपासणीवर खर्चच नाही
जिल्ह्यातील २३ शासकीय धान्य गोदाम तपासणीसाठी २१ मार्च २०१७ रोजी बीडचे पथक आले होते़ या पथकाने दोन दिवसांत २३ गोदामांची तपासणी केली, अशी नोंद आहे़ परंतु,प्रत्यक्षात या गोदाम तपासणी करणाºया पथकावर एक रुपयाही खर्च करण्यात आला नाही़ जर शासकीय गोदामाची तपासणी केली असेल तर शासकीय खर्च न करता कशी काय केली ? पथकातील अधिकारी-कर्मचारी यांच्या जेवणाचा, राहण्याचा आणि गोदामापर्यंत जाण्याचा खर्च कुणी केला? आदी प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते मोतीराम काळे यांनी उपस्थित केले़
---
भाजपाचे शिष्टमंडळ बापट यांच्या भेटीला
धान्य काळा बाजार प्रकरणात भाजपाच्या शिष्टमंडळाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांची भेट घेवून निवेदन दिले़ त्यानुसार, पुरवठा विभागाने अनेक ट्रकला जीपीएस प्रणाली जाणीवपूर्वक बसविली नव्हती़ हा प्रकार राज्य सरकारची बदनामी करणारा आहे़ यातील दोषी अधिकाºयांना त्वरित निलंबित करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली़ त्यावर मंत्री गिरीष बापट यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत या प्रकरणातील दोषींवर मोक्का लावण्याची शिफारस करणार असल्याचे म्हटले़ तसेच दोन ते तीन दिवसांत बैठकीचे आश्वासनही त्यांनी दिले़ शिष्टमंडळात अ‍ॅड़प्रवीण साले, चैतन्यबापू देशमुख, अजयसिंह बिसेन, दिलीपसिंघ सोढी, शितल खांडील, अभिषेक सौंदे यांचा सहभाग होता़

Web Title: Government godown truck directly into Agro company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.