नांदेडला शासकीय 'नर्सिंग कॉलेज' मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:20 AM2021-03-01T04:20:42+5:302021-03-01T04:20:42+5:30
नांदेड :परिचारिकांची वाढती आवश्यकता लक्षात घेता राज्य सरकारने नांदेडला शासकीय परिचर्या महाविद्यालय अर्थात 'नर्सिंग कॉलेज' मंजूर केले आहे. जिल्ह्याचे ...
नांदेड :परिचारिकांची वाढती आवश्यकता लक्षात घेता राज्य सरकारने नांदेडला शासकीय परिचर्या महाविद्यालय अर्थात 'नर्सिंग कॉलेज' मंजूर केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या महाविद्यालयासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता व त्यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोहर उमटवण्यात आली.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबई येथील सह्याद्री शासकीय अतिथीगृहावर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ५० प्रवेश क्षमतेचा बीएससी परिचर्या अभ्यासक्रम सुरू होणार आहे. सोबतच या महाविद्यालयासाठी आवश्यक पदनिर्मिती, यंत्रसामुग्री, फर्निचर, वाहन, पुस्तके आणि दैनंदिन आवर्ती खर्चासाठी १६ कोटी ९ लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.
शैक्षणिक व व्यावसायिकदृष्ट्या नांदेड हे मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर असून, शीख धर्माचे पवित्र स्थान असल्यानेही येथील दळणवळण वेगाने वाढते आहे. साहजिकच येथील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील ताणही वाढतो आहे. या अनुषंगाने परिचारिकांची वाढती गरज लक्षात घेता नांदेड येथे शासकीय परिचर्या महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सद्यस्थितीत महाराष्ट्रात एकूण ११६ परिचर्या महाविद्यालये आहेत. त्यापैकी केंद्र सरकारची दोन, तर राज्य सरकारची चार शासकीय महाविद्यालये आहेत. नांदेड येथे मंजूर झालेले हे महाविद्यालय राज्य सरकारचे महाराष्ट्रातील पाचवे शासकीय महाविद्यालय आहे.
रोजगाराची नवी संधी उपलब्ध होईल : अशोक चव्हाण
नांदेड येथे शासकीय परिचर्या महाविद्यालय मंजूर झाल्याबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख व संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले. ते म्हणाले की, दोनच दिवसांपूर्वी डॉ. शंकरराव चव्हाण यांचा स्मृतिदिवस झाला. या निर्णयातून एक प्रकारे त्यांना आदरांजली अर्पण झाली आहे. केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे; तर संपूर्ण जगात प्रशिक्षित वैद्यकीय मदतनिसांची मागणी वाढते आहे. त्यामुळे शासकीय परिचर्या महाविद्यालय म्हणजे रोजगाराची नवी संधी आहे. हे महाविद्यालय नांदेडला सुरू व्हावे, यादृष्टीने माझे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होते. नवे महाविद्यालय सुरू करण्यासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. आस्थापना व उपकरणे, साहित्य - सामुग्रीसाठी राज्य सरकारने १६ कोटी ९ लाख रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. त्यामुळे नवे महाविद्यालय लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.