शहरातील ३८६ शाळा मनपात वर्ग करण्याचा प्रस्ताव शासनाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 10:52 AM2017-11-08T10:52:33+5:302017-11-08T10:53:32+5:30
महापालिका हद्दीत कार्यरत असलेल्या ३८६ शाळा महापालिकेकडे वर्ग करण्याचा विषय थंडबस्त्यात पडला असून याबाबत महापालिकेकडून पाठपुरावा सुरू असला तरीही शासनाकडून मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने या प्रश्नाचे भिजत घोंगडे कायम आहे.
नांदेड : महापालिका हद्दीत कार्यरत असलेल्या ३८६ शाळा महापालिकेकडे वर्ग करण्याचा विषय थंडबस्त्यात पडला असून याबाबत महापालिकेकडून पाठपुरावा सुरू असला तरीही शासनाकडून मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने या प्रश्नाचे भिजत घोंगडे कायम आहे. त्याचवेळी महापालिका हद्दीत असणा-या शाळांना सेवा पुरवण्याचे काम महापालिका करीत असली तरी त्यांच्याबाबतचा कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेकडे नाही.
महापालिका हद्दीत जिल्हा परिषदेच्या ३७ तर इतर खाजगी संस्थांच्या ३४९ शाळा कार्यरत आहेत तर महापालिकेच्या केवळ १७ शाळा नांदेड शहरामध्ये आहेत. शहरात महापालिकेच्या शाळांमध्ये २ हजार ३४० विद्यार्थीसंख्या आहे तर जिल्हा परिषद आणि इतर खाजगी संस्थांमधील विद्यार्थ्यांची संख्या ही ४ हजार १३९ इतकी आहे. राज्यातील सोलापूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर महापालिका हद्दीतील सर्व शाळा या महापालिकेला जोडलेल्या आहेत. त्याच धर्तीवर नांदेड महापालिका हद्दीतील जिल्हा परिषद शाळा आणि खाजगी संस्थांच्या सर्व शाळा महापालिकेला जोडण्याचा विषय दोन वर्षांपासून चर्चेला येत आहे.
३१ डिसेंबर २०१३ नुसार शहरातील सर्व शाळांचे नियंत्रण मनपाकडे असावे, असे अपेक्षित आहे. त्याच धर्तीवर नांदेड महापालिकेनेही शहरातील सर्व शाळांचे व्यवस्थापन महापालिकेकडे सोपवावे, असा प्रस्ताव एक नव्हे, तर दोन वेळा शासनाकडे पाठविला आहे. मात्र शासनाकडून त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. दुसरीकडे महापालिका शिक्षण विभागाकडे मात्र शहरातील मनपा शाळांसह सर्व शाळांची माहिती व इतर सेवाविषयक माहिती शासनाला पाठविण्याची जबाबदारी कायमस्वरूपी आहे. शहरातील सर्व खाजगी शाळांची कामे महापालिकेने करायची व इतर अधिकार मात्र जिल्हा परिषदेकडे आहेत. परिणामी यावर आता शासनस्तरावरुन निर्णय अपेक्षित आहेत. हा निर्णय घेताना नगरविकास विभाग आणि शिक्षण विभागाला एकत्र येवून तोडगा काढावा लागणार आहे. शासनस्तरावरुन असा निर्णय झाल्यास राज्य शासनाला नांदेडमध्ये १३ केंद्रप्रमुख, ८ विस्तार अधिकारी तसेच इतर लिपिकवर्गीय कर्मचा-यांची नियुक्ती करावी लागणार आहे. त्याचवेळी महापालिकेलाही या शिक्षकांच्या वेतनाचा निम्मा खर्च उचलावा लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या ३७ शाळांमध्ये २१८ शिक्षक मनपा हद्दीत आहेत. खाजगी शाळांमधील शिक्षकांची संख्या खूपच अधिक राहणार आहे, हेही निश्चित आहे.
मनपा शाळांमध्ये शिक्षकांची वाणवा
महापालिका हद्दीत असलेल्या १७ शाळांमध्ये ८९ शिक्षकांची पदे मान्य आहेत. मात्र आजघडीला येथील ३२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. महापालिकेच्या पहिली ते दहावीपर्यंतच्या दोन आणि १ ते ८वी पर्यंतच्या १५ शाळा आहेत. विशेष म्हणजे, शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे महापालिकेच्या १७ शाळांपैकी ४ शाळा या केवळ एका शिक्षकावर चालतात, हेही भयाण वास्तव पुढे आले आहे. विशेष म्हणजे, या एकशिक्षकी असलेल्या शाळामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यामुळे एक शिक्षक पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना किती ज्ञानदान करीत असेल? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.