लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकारने चीनसारखा कायदा करावा : योगगुरू रामदेवबाबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:43 PM2019-06-21T12:43:10+5:302019-06-21T12:59:45+5:30
भारतातही आता कायद्याची गरज आहे.
नांदेड : देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आजघडीला १२५ कोटी आधारकार्ड तयार झाले आहेत. ही लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर देशाचा विकास थांबेल. चीनने लोकसंख्येबाबत कठोर कायदा केल्यानेच लोकसंख्या नियंत्रणात आली. भारतातही आता कायद्याची गरज आहे. असे प्रतिपादन योगगुरू रामदेव बाबा यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त २१ जून रोजी नांदेडमध्ये होणाºया राज्यस्तरीय योग शिबिरासाठी योगगुरु रामदेवबाबा गुरुवारी नांदेडमध्ये दाखल झाले. पत्रकार परिषदेत बोलताना रामदेवबाबा यांनी लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, जन्म घालणे ही काही मोठी गोष्ट नाही. पण त्या पाल्यांचे पालनपोषण करणे गरजेचे आहे. जन्म देवून मुले सोडून देणाऱ्यावरही आता कारवाईची गरज आहे. काळा पैसा भारतात आणण्यासंदर्भातील विषय आपण अद्याप सोडला नसल्याचेही ते म्हणाले. एक देश, एक चुनाव या भूमिकेचेही त्यांनी समर्थन केले. योगासंदर्भात बोलताना योग हा सर्व व्याधी दूर करण्याचा उपाय असल्याचे सांगितले. योगामुळे ९९ टक्के आजार दूर होतात. पतंजलीच्या माध्यमातून योगदिनानिमित्त उद्या देशात तीन ते चार कोटी लोक योग करतील तर जगात १५ ते २० कोटी लोक जागतिक योग दिनानिमित्त योगा करतील, असेही ते म्हणाले. यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, संतुकराव हंबर्डे, चैतन्य देशमुख आदींची उपस्थिती होती.
योगामुळे विरोधकांचेही मनोबल वाढेल
देशातील राजकीय परिस्थिती पाहता विरोधक कमी झाले आहेत. योग हा सर्वांनीच करणे आवश्यक आहे. आज पंतप्रधान, मुख्यमंत्री योगा करीत आहेत. विरोधकांनीही योगा केल्यास त्यांचे मनोबल वाढेल, आत्मविश्वास वाढेल. आगामी काळात त्यांची संख्याही वाढेल, असा टोला रामदेवबाबा यांनी लगावला. योग हा कोणत्या धर्माची मक्तेदारी नाही. नांदेडमध्ये आल्यानंतर सर्वात पहिल्यांदाच आपले स्वागत सना उर्दू माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.
राममंदिरासाठी कायदा करावा
राममंदिराचा प्रश्न हा न्यायालयात असला तरीही तो लोकांचा व देशाच्या आस्थेचा विषय आहे. राममंदिर प्रश्नासंदर्भात नेमलेल्या मध्यस्थांकडून हा प्रश्न सुटेल अशी चिन्हे नाहीत. त्यामुळे सरकारनेच कायदा करावा अन्यथा लोक स्वत:च राममंदिर उभारतील, असे रामदेवबाबा म्हणाले.