सरकारने घेतले झोपेचे सोंग, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष : अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 02:57 PM2019-07-04T14:57:34+5:302019-07-04T14:59:15+5:30
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला काहीही देणेघेणे उरले नाही
नांदेड : राज्यात सरकार झोपेचे सोंग घेत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला काहीही देणेघेणे उरले नसल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये केली़
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गुरुवारी जिल्हाभरात धरणे आंदोलन करण्यात आले़ नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे झालेल्या धरणे आंदोलनात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हेही सहभागी झाले होते़ यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने पुर्णत: दुर्लक्ष केल्याची टीका त्यांनी केली़ पीक विम्याची रक्कम अनेक भागातील शेतकऱ्यांना अद्यापही मिळाली नाही़ पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी रांगा लावून कोट्यवधींची रक्कम भरली आहे़ प्रत्यक्षात शेतकऱ्यांना भरलेल्या रकमेपेक्षाही अत्यल्प विमा मिळाला आहे़ पीक विम्यात कंपन्यांना मोठा नफा झाला आहे़ विमा कंपन्यांकडे शेतकऱ्यांनी प्रिमियमपोटी ५८ कोटी रुपये भरले़ प्रत्यक्षात विम्याच्या रकमेपोटी केवळ १८ टक्के रक्कम मिळाली आहे़
कर्जमाफी फसवी
याकडे सरकारने लक्ष देवून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून देणे गरजेचे आहे़ खरीप हंगाम सुरू होवून महिना उलटला तरी पीक कर्ज अद्याप वाटप झाले नाही़ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला काही देणेघेणे नाही अशीच परिस्थिती आहे. सरकारने घोषित केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचे स्पष्ट झाले आहे़ दोन वर्षापूर्वी घोषित केलेल्या कर्जमाफीचा छदामही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे चव्हाण म्हणाले़
या आंदोलनात माजी राज्यमंत्री आ़ डी़पी़सावंत, आ़अमरनाथ राजूरकर, महापौर दीक्षा धबाले, मनपा सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, स्थायी समिती सभापती फारूखअली खान, अमित तेहरा, विलास धबाले, किशोर स्वामी, जि़प़च्या समाज कल्याण सभापती शिला निखाते, अनुजा तेहरा आदींची उपस्थिती होती़