अवैध वाळूवर शासनाचे नवे धोरण; एका ट्रकवर लागणार एक लाखाचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 05:36 PM2018-02-08T17:36:53+5:302018-02-08T17:37:23+5:30
अवैध वाळू वाहतुकीवर दंडात्मक कार्यवाहीत वाढ झाली असून यापुढे नवीन सुधारित अधिसूचनेनुसारच दंड आकारला जाईल, अशी माहिती बिलोलीचे उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली
बिलोली (नांदेड ) : अवैध वाळू वाहतुकीवर दंडात्मक कार्यवाहीत वाढ झाली असून यापुढे नवीन सुधारित अधिसूचनेनुसारच दंड आकारला जाईल, अशी माहिती बिलोलीचे उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली़ दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पकडण्यात आलेल्या एका वाळूच्या ट्रकवर एक लाखांचा दंड आकारून नवीन अधिसूचनेचा मुहूर्त करण्यात आला़ वाढलेल्या दंड रकमेच्या कार्यवाहीमुळे अवैध वाळू व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत़
आगामी आठवड्यात तेलंगणा सीमावर्ती मांजरा पात्रातील शासकीय वाळू घाटांचा उपसा सुरू होणार आहे़ १७ पैकी ७ शासकीय वाळू घाटांची ई-लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे़ सर्व वाळू घाटांच्या ठेकेदारांकडून ८१ नियम अटींचे हमीपत्र घेवून इसारा रक्कम भरून घेण्यात आली़ रॉयल्टी पावती नसेल तर वाळू वाहतुकीवर मोठी दंडात्मक कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट आदेश महसूल विभागाने जारी केले आहेत़ विनारॉयल्टी अथवा बनावट रॉयल्टी पावती सापडल्यास वाळूच्या ट्रकवर चोरीचा तसेच फसवल्याचा गुन्हा दाखल करण्याचे सुधारित आदेश जारी झाले आहेत़
बिलोलीपासून सीमेवर असलेल्या मांजरा नदीच्या वाळूला महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणात मागणी आहे़ मागच्या १५ वर्षांपासून त्या राज्यात वाळू उपशावर कडक निर्बंध आहेत़ परिणामी बिलोली व देगलूरच्या वाळू घाटांना महत्त्व आले़ शासकीय व खाजगी वाळू घाट अथवा पट्ट्यातून शासकीय मुद्देमाल अवैधरीत्या आढळून आल्यास आता कोणतीही गय केली जाणार नाही, असे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे़ मागच्या कित्येक वर्षांत बनावट रॉयल्टीच्या पावत्या वापरात आलेली अनेक उदाहरणे पुढे आली व पोलिसांत गुन्हे दाखल झाले होते़
वाळूचे घाट अगदी तेलंगणा सीमेवरच असल्याने परस्पर त्या राज्यात वाळूची पद्धतशीर विल्हेवाट होत आली़ आता राज्य शासनाने अवैध वाळूच्या संदर्भात वाहनाच्या प्रकारान्वये दंड रकमेची वाढ केली आहे़ त्यामुळे याच जी़आऱ नुसार दंड आकारला जाईल़ दोन दिवसांपूर्वी पकडलेल्या एका अवैध वाळूच्या ट्रकला बिलोली महसूल प्रशासनाने एक लाखाचा दंड आकारुन जिल्ह्यात नवीन अधिसूचनेचा मुहूर्त केला़
अवैध वाळू वाहतुकीवर कार्यवाहीच
चोरीची किंवा विनारॉयल्टीचे एकही वाहन अथवा ट्रक पकडल्यास सुधारित जी़आऱ नुसारच यापुढे दंडात्मक कार्यवाही केली जाईल़ महसूल विभागाकडून फिरते पथक नेमण्यात येणार आहे़ अवैध वाळू वाहतुकीच्या भानगडीत पडू नये अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही
- विनोद गुंडमवार, तहसीलदार, बिलोली़
वशिलेबाजी करू नका
अवैध वाळूचा ट्रक अथवा वाहन पकडल्यानंतर दंडात्मक कार्यवाहीदरम्यान राजकीय वशिलेबाजी करण्याचा प्रकार होत आहे़ प्रशासकीय कामकाजात कोणतीही वशिलेबाजी चालणार नाही़ नियमानुसार अवैध वाहनावर कार्यवाही केलीच जाईल
-निवृत्ती गायकवाड, उपविभागीय अधिकारी, बिलोली़
सुधारित जी़आऱनुसार दंडाचा तक्ता
साधन / वाहन प्रकार शासकीय दंडाची रक्कम
ड्रील मशीन २५ हजार रुपये
ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली १ लाख रुपये
हाफ बॉडी ट्रक ,सक्शन पंप १ लाख रुपये
फुल बॉडी ट्रक, ट्रॉली, टिप्पर २ लाख रुपये
ट्रॉलर, मोटोराईज्ड बोट ५ लाख रुपये
एक्सकेवेटर, जेसीबी मशीन, मेकॅनाईज्ड लोडर ७.५ लाख रुपये