वसतिगृहाचे उद्घाटन न करताच राज्यपाल निघाले; साधी पाहणीही केली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 02:30 PM2021-08-05T14:30:35+5:302021-08-05T14:34:47+5:30
Governor bhagat Singh Koshyari visit's Nanded : वसतिगृहाच्या समोरून राज्यपालांचा ताफा गेला, मात्र त्यांनी तिथे थांबून साधी पाहणीही केली नाही.
नांदेड : राजकीय आरोप प्रत्यारोपानंतर नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील वसतिगृहाचे उदघाटन करण्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी टाळले. आज दुपारी उदघाटन करण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या समोरून राज्यपालांचा ताफा गेला, मात्र त्यांनी तिथे थांबून साधी पाहणीही केली नाही.
दरम्यान, नवाब मलिक यांनी या वसतिगृहाचे उदघाटन राज्यपाल कसे करू शकतात असा सवाल उपस्थित केला होता. त्यामुळे राज्यपालांनी उदघाटन आणि पाहणी समारंभ टाळला असावा अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या उदघाटन कार्यक्रमास विरोध दर्शविला होता. नांदेड येथील वापरात असलेल्या वसतीगृहाचे उद्घाटन राज्यपाल यांच्या हस्ते करून काय सिद्ध होणार ? जुन्या इमारतीच्या उद्घाटनाचा अट्टहास का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. राज्यपालांच्या हस्ते नवीन इमारत, नवीन शैक्षणिक उपक्रम, विद्यापीठातील नवीन वसतिगृह, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे उपक्रम असे समारंभ करणे हा त्यांच्या पदाचा सन्मान ठेऊन घेणं अपेक्षित आहे. चार वर्षे वापरात असलेल्या इमारतीचे उद्घाटन नाही. असेही सामंत म्हणाले आहेत.
'मै खुश हुआ'; विद्यापीठातील जल पुनर्भरणाच्या प्रकल्पाचे राज्यपालाकडून कौतुक
विद्यापीठ परिसराची केली पाहणी
राज्यपालांना विविध विकास कामाची चित्रफीत दाखविण्यासाठी विद्यापीठात तयारी केली होती, पण ऐनवेळी राज्यपाल म्हणाले, ही माहिती मला नंतर दाखवली तरी चालेल, मला समोरच्या इमारतीवरून परिसर पाहायचा आहे. त्यामुळे या ठिकाणचे नियोजन बिघडले. राज्यपाल थेट गणित संकुलाकडे गेले, या वेळी त्यांच्यासोबत निवडक अधिकारी होते, राज्यपाल नेमके कुठे गेले हे अनेकांना माहीत नव्हते. बऱ्याच वेळेनंतर कलेक्टर त्या दिशेने पळाले, तर कुलगुरू डॉ. भोसले हे राज्यपाल गाडीत बसल्यानंतर धावतच आपल्या गाडीत बसले. यावेळी त्यांची चांगलीच धावपळ उडाली.