राज्यपालांचा दौरा व्यापाऱ्यांच्या मुळावर; पोलिसांनी मुख्य रस्त्यावरील दुकाने बंद ठेवण्यास सांगितल्याने संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 12:13 PM2021-08-05T12:13:31+5:302021-08-05T12:15:15+5:30
The governor's visit to Nanded : बंदोबस्ताच्या नावाखाली पोलिसांनी अतिरेक करत राज्यपाल जाणाऱ्या रस्त्यावरची दुकाने बंद ठेवायला सांगितली आहेत.
नांदेड : राज्यपाल भगतसिंह कोशारी नांदेडमध्ये आज सकाळी दाखल झाले आहेत. यावेळी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मुख्य रस्त्याला जोडणारे अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांनी राज्यपाल कोशारी जाणाऱ्या रस्त्यावरील दुकाने चार वाजेपर्यंत बंद ठेवण्यास सांगितले आहे. मात्र, यामुळे व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्यपालांचा नांदेड दौरा हा व्यापाऱ्यांच्या मुळावर आल्याचे चित्र आहे. बंदोबस्ताच्या नावाखाली पोलिसांनी अतिरेक करत राज्यपाल जाणाऱ्या रस्त्यावरची दुकाने बंद ठेवायला सांगितली आहेत. विशेषतः नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा अतिरेक जास्तच दिसून आलाय. पोलिसांनी रस्त्यावरच्या व्यापाऱ्यांना चार वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवायला सांगितली आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.
आज सकाळी मुख्य रस्त्यावरील दुकाने, छोटे व्यापारी, खाण्यापिण्याचे पदार्थ , फळांचे गाडे यांना पोलिसांनी चार वाजेपर्यंत बंद ठेवण्यास सांगितले. ऐनवेळी असा निर्णय जाहीर केल्याने खाण्यापिण्याची छोटी हॉटेल, गाडे चालवणाऱ्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कालच दुकाने बंद ठेवण्याची कल्पना दिली असती तर आम्ही तशी तयारी केली असती. ऐवढे नुकसान झाले नसते अशा प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.