समन्वयातून आरक्षणाचा मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील: अशोकराव चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 07:43 PM2024-07-06T19:43:16+5:302024-07-06T19:45:32+5:30
ओबीसी विरूद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होऊ नये
- गोविंद टेकाळे
अर्धापूर ( नांदेड ): गावागावात मराठा ओबीसी वाद होणार नाही यासाठी समन्वय ठेवून आरक्षणाचा मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी शनिवारी अर्धापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.
मराठा समाजाला आरक्षण हे भाजप सरकारनेच दिलेले असून आमचा आरक्षणाला विरोध नाही. ओबीसी विरूद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होऊ नये यासाठी मराठा ओबीसी मानसन्मान ठेवून आरक्षणाचा मार्ग काढला पाहिजे. यासाठी सरकार प्रयत्नशील असून मराठा आरक्षणावर योग्य मार्ग काढणे तितकेच महत्त्वाचे आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने युती सरकार प्रयत्नशील आहे. असे यावेळी चव्हाण म्हणाले.
दि.५ शुक्रवारी अंतरवाली सराटी येथे खा. अशोकराव चव्हाण व खा. संदिपान भुमरे यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण नेते जरांगे पाटील यांची भेट घेतली. हैदराबादचे गॅझेट व सातारा संस्थांनचे गॅझेटवर मनोज जरांगे यांच्याशी चर्चा झाली. मराठा समाजाच्या मागण्यांचा सरकार पुढे पाठपुरावा करण्याची जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो, असे जरांगे पाटील यांच्याशी बोलताना व्यक्त केल्याचे चव्हाणांनी सांगितले.
शिंदे समिती हैदराबाद गॅझेट व सातारा गॅझेटचा अभ्यास करणार आहे. सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्नशील आहे. तर १० टक्के (एसईबीसी) आरक्षण सर्व चालू भरती प्रक्रियेत लागू झाले आहे. सरकारच्या सर्व जाहिरातीमध्ये दहा टक्के चा उल्लेखही येत आहे. असे अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील कार्यक्रमात बोलतांना खासदार चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी अमर राजुरकर, चेअरमन गणपतराव तिडके, गोविंदराव नागेलीकर, सभापती संजय देशमुख लहानकर, शामराव टेकाळे, डॉ लक्ष्मण इंगोले, बालाजी गव्हाणे, बळवंत इंगोले, सरपंच मारोतराव बुट्टे, उपसरपंच मनोहर खंदारे,डॉ.बालासाहेब बंडेवार आदींची उपस्थिती होती.