धान्य घोटाळ्यातील जप्त धान्याची संयुक्त मोजदाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:50 AM2018-08-28T00:50:04+5:302018-08-28T00:50:41+5:30
कृष्णूर येथील मेगा इंडिया अॅग्रो अनाज कंपनीच्या छाप्यात जप्त केलेले ट्रक नेमके कुठे आहेत, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे खुलासा मागितल्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणात जप्त करण्यात आलेले धान्याचे दहा ट्रक पुरवठा विभागाच्या ताब्यात दिले आहेत. या ट्रकमधील धान्याची मोजदाद करण्याचे काम २७ आॅगस्ट रोजी सुरु झाले होते. त्याचवेळी उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे या प्रकरणाची चौकशी सोपविण्यात आली असून २८ आॅगस्टपर्यंत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : कृष्णूर येथील मेगा इंडिया अॅग्रो अनाज कंपनीच्या छाप्यात जप्त केलेले ट्रक नेमके कुठे आहेत, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे खुलासा मागितल्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणात जप्त करण्यात आलेले धान्याचे दहा ट्रक पुरवठा विभागाच्या ताब्यात दिले आहेत. या ट्रकमधील धान्याची मोजदाद करण्याचे काम २७ आॅगस्ट रोजी सुरु झाले होते. त्याचवेळी उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे या प्रकरणाची चौकशी सोपविण्यात आली असून २८ आॅगस्टपर्यंत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
मेगा अॅग्रो अनाज कंपनीत पोलिसांनी पुरवठा विभागाचे धान्य असलेले दहा ट्रक जप्त केले होते. यातील तीन ट्रक नांदेड जिल्ह्यातले तर सात ट्रक हिंगोली जिल्ह्यातील होते. पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातील तीन ट्रकच्या धान्याच्या तपासात तीन वर्षांचे रेकॉर्ड पुरवठा विभागाकडे मागितले होते. त्याचवेळी अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांनी तपास केला. मात्र त्याचवेळी जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये महसूल विभागाला या प्रकरणाची माहिती देणे आवश्यक असताना पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नाही. याबाबत प्रारंभी पुरवठा अधिकाºयांनी पोलिसांना पत्र दिले. त्या पत्रावरही पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. अखेर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी २१ आॅगस्ट रोजी तपास करणाºया सहायक पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांना पत्र पाठवित १ आॅगस्ट रोजी कृष्णूर येथे तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी हे गेले असता त्या ठिकाणी कारवाई केलेले कोणतेही ट्रक नसल्याचे नमूद केले. त्यामुळे हे ट्रक नेमके आहेत कुठे याबाबत खुलासा करावा, अशी सूचना केली होती. पोलिसांनी जप्त केलेले गोदामातील धान्य आणि ट्रकमधील धान्य याबाबतही माहिती विचारली होती. हे पत्र मिळताच पोलिसांनी कृष्णूरच्या मेगा अॅग्रो अनाज कंपनीत धाड टाकलेले दहा ट्रक सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस मुख्यालयात ठेवल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच हे ट्रक महसूल विभागाच्या ताब्यात दिले आहेत. त्यानंतर सदर ट्रक शासकीय गोदामात नेले असून धान्याची मोजदाद केली जात आहे. हे धान्य खाण्यायोग्य राहिले की नाही, याबाबत तपासणी केली जाणार आहे.
पारसेवारच्या जामिनावर बुधवारी निर्णय
कृष्णूरच्या मेगा अॅग्रो अनाज कंपनीतील धान्य घोटाळा प्रकरणात शासकीय धान्याची वाहतूक करण्याचे कंत्राट असलेल्या राजू पारसेवार याच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी बिलोली येथील सत्र न्यायालयात बचाव पक्षाचा युक्तिवाद झाला़ सरकार पक्षाच्या वतीने बुधवारी आपली बाजू मांडण्यात येणार असून त्यानंतरच पारसेवारच्या जामिनाबाबत निर्णय होणार आहे़
बिलोली सत्र न्यायालयाचे न्या़ एस़ बी़ कत्रे यांच्यासमोर हा युक्तिवाद झाला़ यावेळी बचाव पक्षाच्या वतीने अॅड़ व्ही़ एम़ देशमुख यांनी पारसेवार यांची बाजू मांडताना जिल्हाधिकाºयांच्या अहवालातील अनेक मुद्यांचा उल्लेख केला़ पोलिसांनी पकडलेल्या दहा ट्रकपैकी फक्त तीन ट्रकचा संबंध असल्याचे सांगत ते नायगाव, मुक्रमाबाद आणि कुंडलवाडी या नियोजित मार्गावरच जात असल्याचे नमूद करण्यात आले़ सुनावणीच्या वेळी न्यायालयात तपास अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन हे उपस्थित होते़ सोमवारी बचाव पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर सरकार पक्षाच्या वतीने आता बुधवारी युक्तिवाद करण्यात येणार आहे़ त्यानंतरच पारसेवार यांच्या जामिनाबाबत निर्णय होणार आहे़
सहा सदस्यीय चौकशी पथक
जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये महसूल विभागाने या प्रकरणात कारवाई सुरु केली आहे. जिल्हाधिकाºयांनी नांदेडचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. यात तहसीलदार सुरेश घोळवे, नायब तहसीलदार विजय चव्हाण, राम बोरगावकर या महसूल अधिकाºयांसह स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षकांचाही समावेश आहे. या चौकशी पथकाने धाडीत जप्त केलेल्या धान्याची मोजणी सुरु केली होती. उद्या मंगळवारी मोजणी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.