ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:34 AM2020-12-12T04:34:47+5:302020-12-12T04:34:47+5:30
भोकर : तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यासाठी १९३ वाॅर्डांतून ५१३ ...
भोकर : तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यासाठी १९३ वाॅर्डांतून ५१३ ग्रामपंचायत सदस्यांची सार्वत्रिक मतदानाद्वारे निवड करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी शुक्रवारी दिली.
बहुप्रतीक्षित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. भोकर तालुक्यात एकूण ६६ ग्रामपंचायती आहेत. त्यातील चिंचाळा, कोळगाव बु., नांदा खु. या तीन ग्रामपंचायती वगळता उर्वरित ६३ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे येथील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे. १५ जानेवारी रोजी तहसीलदारांमार्फत निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे. २३ ते ३० जानेवारी या कालावधीत (२५, २६ व २७ ची सुटी वगळून) उमेदवार नामनिर्देशन पत्र सादर करणे. ३१ जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी, ४ जानेवारी नामनिर्देशन पत्र मागे घेता येतील. त्याच दिवशी दुपारी ३ नंतर उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. अखेर १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १८ रोजी मतमोजणी होणार आहे. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच गावागावात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने त्यात अधिकच रंग भरणार आहे. गावपुढाऱ्यांनी आपल्या वर्चस्वासाठी ‘साम-दाम-दंड-भेद’ची आखणी सुरू केली आहे.