ग्रामपंचायत निवडणुक: अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मिळणार अडीच तासांचा बोनस वेळ
By प्रसाद आर्वीकर | Published: October 18, 2023 03:21 PM2023-10-18T15:21:53+5:302023-10-18T15:29:16+5:30
शुक्रवारी सायंकाळी साडेपाच पर्यंत दाखल करता येणार अर्ज
नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने अडीच तासांचा वेळ वाढवून दिला आहे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीत १६ ऑक्टोबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला होता. ऑनलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल केले जात आहेत. ऑनलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल करताना प्रिंट काढण्यास विलंब लागत असल्याची तक्रार काही उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी अडीच तासांचा वेळ वाढवून दिला आहे. पूर्वी २० ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते ३.३० वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येत होते. आता सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. उमेदवारांना वाढीव बोनस वेळ मिळाला असून, उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात २५ ग्रामपंचायतीत निवडणूक
जिल्ह्यात २५ ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. सदस्य आणि सरपंच मतदारांमधून निवडले जाणार आहेत. त्याचप्रमाणे १९२ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.