ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना कुठे धक्का तर कुठे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:20 AM2021-01-19T04:20:32+5:302021-01-19T04:20:32+5:30
भोकर : तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात मतदारांनी अनेक प्रस्थापितांना बळ दिले तर काही प्रस्थापितांना धक्का देत नव्या ...
भोकर : तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात मतदारांनी अनेक प्रस्थापितांना बळ दिले तर काही प्रस्थापितांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. गावपुढाऱ्यांच्या चुरशीच्या निवडणुकीत राजकीय पक्षांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी काँग्रेस समर्थकांनी आपले वर्चस्व राखले आहे.
भोकर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या ३३३ सदस्य पदाकरिता झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी घोषित करण्यात आला. गावपुढाऱ्यांच्या निवडणुकीत राजकीय प्रस्थापितांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. तरीही मतदारांनी त्यांना अनेक ठिकाणी डावलून नवीन राजकीय समीकरण तयार केले आहे. काँग्रेस तालुकाध्यक्ष जगदीश पाटील व माजी सभापती तथा जि.प. सदस्य प्रकाश भोसीकर यांचे भोसी आणि जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी रावणगाव या आपल्या ग्रामपंचायतीवर कायम वर्चस्व ठेवले. तालुक्यातील किनी येथे भाजपाचे जि. प. सदस्य दिवाकररेड्डी सुरकुंठवाड आणि काँग्रेस समर्थकांच्या दोन गटात चुरशीची लढत झाली. येथील मतदारांनी एकाही गटाला बहुमत दिले नसून सत्यमरेड्डी यांच्या गटाला ५ तर त्रिपतरेड्डी यांच्या गटाला २ आणि सुरकुंठवाड यांच्या पॅनलला ४ जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेसाठी याठिकाणी अभद्र युती होणार की निवडणुकीत एकमेकांविरुद्ध सामना केलेले भाऊ एकत्र येणार हे पुढील काळात समजेल. मतदानाच्या दिवशी दोन गटात हाणामारी झाल्याने गुन्हा दाखल झालेल्या चिदगिरी ग्रामपंचायतीत पं.स.चे माजी सभापती यांचे पती गुलाबराव नाईक यांना पराभवाचा सामना करावा लागला तरी त्यांचे पॅनल बहुमतात आले. जामदरी येथे बाजार समितीचे उपसभापती गणेश राठोड, रायखोड येथे पं.स.चे माजी सभापती सुरेश बिल्लेवाड यांच्या पॅनलला मतदारांनी नाकारला. तसेच दिवशी येथे सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष राजू पाटील दिवशीकर यांनाही बहुमत मिळविता आले नाही. हळदा येथे निवडणुकीतील तिन्ही पॅनलचे प्रत्येकी ३ उमेदवार निवडून आल्याने येथे परस्पर विरोधात लढलेले काका - पुतणे सत्ता स्थापनेसाठी एकत्र येतील का? याची उत्सुकता लागली. निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागलेल्या मतदारांनी सकाळपासूनच तहसील परिसरात मोठी गर्दी केली होती. विजयाच्या निकालाने आनंदित झालेल्यांनी घोषणाबाजी करीत गुलाल उधळला.
चौकटीसाठी
मतमोजणी दरम्यान समसमान मते मिळाल्याने दिवशी खु, (वार्ड क्र१), लामकाणी (वार्ड क्र. १ व २), आणि जाकापूर (वार्ड क्र. १) आदी ४ उमेदवारांचा विजय ईश्वर चिठ्ठीने घोषित करण्यात आला.
चौकटीसाठी
तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ५० पेक्षा अधिक ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या समर्थकांना मिळालेले यश हे माजी मुख्यमंत्री तथा सा.बां.मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदारांनी दाखविलेला विश्वास आहे. :- जगदीश पाटील भोसीकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष भोकर.