ग्रामपंचायतींची रणधुमाळी ठरणार गावांच्या अर्थकारणाला चालना देणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:34 AM2020-12-15T04:34:05+5:302020-12-15T04:34:05+5:30
लोहा : लोहा तालुक्यात ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू होणार आहे. यात एप्रिल ते डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपणाऱ्या ...
लोहा : लोहा तालुक्यात ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू होणार आहे. यात एप्रिल ते डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपणाऱ्या ८४ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. तहसीलदार विठ्ठल परळीकर निवडणुकीची नोटीस १५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करणार आहेत. नामनिर्देशनपत्र मागण्याचा व भरण्याचा २३ ते ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ राहणार आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी ४ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. निवडणूक चिन्ह व अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी ४ जानेवारी निश्चित होईल व प्रत्यक्ष मतदान १५ जानेवारी रोजी होणार आहे.
तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यात अंतेश्वर, पेनूर, बोरगाव, माळाकोळी, माळेगाव, सावरगाव, आडगाव, शेवडी(बा.), कलंबर (खु.), खांबेगाव, भारसावडा, हरसद, मरतळा यासह जवळपास ५० टक्के गावांमध्ये निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. परिणामी गावगाड्याच्या अर्थकारणाला मोठा हातभार लागणार आहे. निवडणूक जाहीर होताच पक्षीय, तसेच स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
तालुक्यात अनेक गावांच्या निवडणुका भाजपाविरुद्ध महाविकास आघाडी भाऊबंदकी व वाड्यांमध्ये रंगतात. शिवाय एकाच पक्षाचे दोन गट आमनेसामने उभे ठाकतात. निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने लाखो रुपयांची उधळपट्टी होते. ग्रामीण भागातील चहाची दुकाने, हॉटेल, उपाहारगृहांना झळाळी मिळते. अखेरच्या टप्प्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये आर्थिक उलाढालीही लक्षवेधी असते. एकूणच ग्रामपंचायत निवडणूक ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना देणारी ठरणार आहे. निवडणुकीचा निकल १८ जानेवारी रोजी लागणार आहे.